संग्रहित फोटो
पिंपरी : कडक उन्हाळा आणि वाढत्या मागणीमुळे पिंपरी- चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. शनिवारी (दि. ४) सकाळी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, धरणात आता केवळ ४६.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जून अखेरपर्यंत म्हणजेच पावसाळ्याच्या आगमनापर्यंत शहराला पुरेल इतकाच असल्याने, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
पाणीपुरवठ्याचे सद्यस्थिती आणि नियोजन
पिंपरी चिंचवड शहराला मुख्यत्वे मावळ तालुक्यातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दररोज रावेत येथील बंधाऱ्यातून ५२० एमएलडी पाणी उचलते. याव्यतिरिक्त: एमआयडीसी: शहराच्या काही भागांसाठी ३० एमएलडी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
आंद्रा धरण योजना : निघोजे येथील इंद्रायणी नदीच्या बंधाऱ्यातून दररोज ८० ते ९० एमएलडी पाणी उचलून चिखली जलशुद्धीकरण केंद्राद्वारे परिसरात पुरवले जात आहे.
सध्याची स्थिती : गेल्या सव्वासहा वर्षांपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.
इतर धरणांमधील पाणीसाठा
पवना धरणासोबतच परिसरातील इतर धरणांची स्थिती खालीलप्रमाणे आहे
आंद्रा धरण : ५३.६८ टक्के साठा.
भामा आसखेड धरण : ६२.३७ टक्के साठा. (प्रकल्प अपूर्ण असल्याने शहर १६७ एमएलडी पाण्यापासून अद्याप वंचित आहे).
मुळशी धरण : ४५.२४ टक्के साठा उपलब्ध असून, हे पाणी मुळा नदीत सोडले जाते.
“तीव्र उन्हामुळे बाष्पीभवन आणि वाढती मागणी यामुळे पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. नागरिकांनी नळ गळती थांबवावी, वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा आणि शिळे पाणी फेकून देऊ नये. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे काळाची गरज आहे.” — अजय सूर्यवंशी, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग.
प्रशासनाचे आवाहन: पाण्याचा अपव्यय टाळा
पाणीटंचाईचे सावट गडद होऊ नये यासाठी पालिकेने कडक सूचना दिल्या आहेत. विशेषतः अंगण, रस्ते, जिने किंवा वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये. तसेच घरातील नादुरुस्त नळ त्वरित दुरुस्त करून घेऊन पाण्याची नासाडी थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






