बँक खात्यांची सुरक्षा धोक्यात? निर्मला सीतारमण यांनी दिला इशारा, AI मुळे वाढली चिंता
क्लॉड माइथोस हे अँथ्रोपिकचे आतापर्यंतचे सर्वात पावरफुल AI मॉडेल मानले जात आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे मॉडेल सायबर सुरक्षेच्या बाबतीत अतिशय सक्षम आहे आणि यामुळे ते सामान्य लोकांसाठी उपलब्ध केले जाऊ शकत नाही. असं सांगितलं जात आहे की, या एआय मॉडेलने हजारो अशा सुरक्षा त्रुटी शोधल्या आहेत, ज्या अनेक वर्षांत मानवांना देखील शोधता आल्या नाहीत. यामधील काही त्रुटी 27 वर्षे जुन्या होत्या. या त्रुटी मोठ्या ऑपरेटिंग सिस्टम आणि वेब ब्राउजरमध्ये होत्या. या त्रुटींमुळे सायबर अटॅक होण्याची आणि डेटा चोरीला जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात होती. (फोटो सौजन्य – X)
Union Minister for Finance and Corporate Affairs Smt. @nsitharaman today chaired a high-level meeting, along with Union Minister for Electronics and Information Technology, Railways and I&B Shri @AshwiniVaishnaw, with Scheduled Commercial Banks and key stakeholders to assess the… pic.twitter.com/TrQrDCkMKE — Ministry of Finance (@FinMinIndia) April 23, 2026
अँथ्रोपिकचे क्लॉड माइथोस सध्या काही निवडक कंपन्यांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि गूगल सारख्या टेक कंपन्यांचा समावेश आहे. मात्र, अहवालानुसार काही अनधिकृत यूजर्सनी सिस्टीममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही एक मोठी चिंतेची बाब आहे. कारण यामुळे सायबर सुरक्षेतील त्रुटींचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या टेक कंपन्यांमधील माहिती चोरुन त्यांचा चुकीचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.
हा मुद्दा केवळ भारतापर्यंत मर्यादित राहिलेला नाही. रिपोर्ट्सनुसार, अमेरिका सरकार देखील AI मॉडेलबाबत सतर्क आहे आणि त्यांनी वॉल स्ट्रीट बँकांसोबत याबाबत संभाषण करण्यास देखील सुरुवात केली आहे. सायबर सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी व्हाईट हाऊस देखील आपल्या संस्थांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार करत आहे.
भारत सरकार या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी एक मजबूत फ्रेमवर्क तयार करण्याची योजना आखत आहे. याचा उद्देश असा आहे की, कोणत्याही सायबर हल्ल्याची ओळख पटवणं आणि वेळीच त्यावर कारवाई करणं. बैठकीत अर्थमंत्र्यांनी बँकांना त्यांचे आयटी सिस्टिम मजबूत करण्यासाठी आणि ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची पाऊलं उचलण्यास सांगितली आहे. बँकांमध्ये धोक्याची तात्काळ माहिती एकमेकांना देण्यासाठी एक प्रणाली स्थापित करण्यावरही भर देण्यात आला.
अर्थ मंत्रालयाने असा सल्ला दिला आहे की, बँका, भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक आणि इतर संस्थांमध्ये अधिक चांगला समन्वय निर्माण केला पाहिजे. यामुळे कोणत्याही धोक्याची लवकर ओळख पटू शकते आणि सर्व संस्थांना सतर्क केले जाऊ शकते. इंडियन बँक्स असोसिएशनला देखील अशी एक प्रणाली विकसित करण्यास सांगितले आहे की, जे कोणत्याही सायबर धोक्याला त्वरित प्रतिसाद देऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया क्लाउड मिथोसमुळे भारतीय वित्तीय क्षेत्राला निर्माण होऊ शकणाऱ्या धोक्याचा सखोल अभ्यास करत आहेत.






