सौजन्य - नवराष्ट्र टीम
वडगाव मावळ/सतिश गाडे : मावळ तालुक्यात पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सोमवारी अक्षरशः रौद्ररूप धारण केले आहे. अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे पुणे–मुंबई एक्सप्रेसवे, जुना पुणे–मुंबई महामार्ग, रेल्वे मार्ग तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आले असून, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफची पथके युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत.
सततच्या अतिवृष्टीमुळे इंद्रायणी, पवना तसेच इतर लहान-मोठ्या नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये, दुकाने, कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
पुणे– मुंबई एक्सप्रेसवेवर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जुना पुणे–मुंबई महामार्ग तर अनेक ठिकाणी पूर्णपणे जलमय झाला असून, देहूरोड ते लोणावळा दरम्यान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. रस्त्यावर अनेक वाहने पाण्यात अडकली असून प्रवाशांना तासन्तास अडकून राहावे लागले आहे.
दरम्यान, साते फाटा परिसरात पाण्याच्या प्रचंड प्रवाहात एक टेम्पोचालक टेम्पोसह वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टेम्पो चालकाचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. घोरावडी रेल्वे स्थानकाजवळ पाण्यात अडकलेल्या खासगी बसमधील ३७ प्रवाशांची एनडीआरएफच्या जवानांनी अत्यंत धाडसी पद्धतीने सुखरूप सुटका केली. या बचावकार्यात स्थानिक प्रशासन, पोलीस आणि स्वयंसेवकांनीही मोलाची मदत केली.
तळेगाव दाभाडे शहरात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली आहे. शहरातील हिंदमाता भुयारी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. घोरावडी ते तळेगाव दाभाडे दरम्यान रेल्वे रुळाखालची माती वाहून गेल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. वडगाव नगरपंचायत हद्दीतील मुख्य बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरून मालाचे नुकसान झाले आहे. पोटोबा महाराज मंदिर परिसरासह शहरातील अनेक भाग जलमय झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लोणावळा परिसरातही अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, काही ठिकाणी विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका वाढल्याने प्रशासनाकडून विशेष सतर्कता बाळगण्यात येत आहे. संपूर्ण मावळ तालुक्यात वीजपुरवठ्यावर परिणाम झाला असून काही भागांमध्ये इंटरनेट व दूरध्वनी सेवाही विस्कळीत झाल्या आहेत.
हे सुद्धा वाचा : मावळ तालुक्यातील पाटण गावात घरावर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
शाळा, महाविद्यालये आणि अनेक व्यावसायिक आस्थापनांवर या पावसाचा परिणाम झाला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पूरग्रस्त भागात जाणे टाळावे आणि अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मावळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुढील काही तास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.






