सौजन्य - नवराष्ट्र टीम
पाहणी दरम्यान, प्रवाशांशी संवाद साधत असताना ‘नाथजल’च्या एक लिटर बाटलीसाठी २० रुपये उकळले जात असल्याचे काही प्रवाशांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. याची गंभीर दखल घेत सरनाईक यांनी संबंधित विक्रेत्याला जाब विचारला आणि तात्काळ स्पष्ट दरफलक लावण्याच्या सूचना दिल्या. यापुढे १५ रुपयांची बाटली महाग विकल्यास परवाना रद्द करण्याची तंबीही त्यांनी यावेळी दिली.
खाजगी हॉटेल्सवर थांबणाऱ्या बसेसना लगाम
लोणावळा बसस्थानकावर येणाऱ्या काही बसफेऱ्या स्थानकात न येता परस्पर पुढे जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. तसेच, अनेक बसेस जाणीवपूर्वक खाजगी हॉटेलांवर थांबवल्या जातात, जिथे खाद्यपदार्थ महाग असल्याने प्रवाशांची लूट होते. या तक्रारींची दखल घेत, “कोणतीही एसटी बस खाजगी हॉटेलवर थांबणार नाही, सर्व बसेसनी नियोजित वेळापत्रकानुसार लोणावळा बसस्थानकातच थांबले पाहिजे,” असे स्पष्ट निर्देश सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले.
हे सुद्धा वाचा : झटपट पैसे कमावण्याची हाव पडली भारी; आयटी इंजिनिअर तरुणीने गमावले सव्वा दोन कोटी
सुविधांचा आढावा आणि सुधारणांचे आदेश
या दौऱ्यात मंत्र्यांनी बसस्थानकातील स्वच्छता, प्रसाधनगृहे, तिकीट व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची सोय या मूलभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. प्रवाशांना मिळणारी सेवा अधिक दर्जेदार आणि सुलभ असावी, यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आदेश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या आणि एसटी सेवेत पारदर्शकता व कार्यक्षमता आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे नमूद केले.






