संग्रहित फोटो
पुणे : पुर्ववैमन्यासातून घडलेल्या रक्तरंजित घटनेने पुणे शहर पुन्हा हादरले असून, फुरसुंगीत ऐन गर्दीच्या वेळीच सहा जणांच्या टोळक्याने भर रस्त्यात एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या खूनाच्या थरारानंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. तर, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. स्थानिक तरुणांमधील वादविवाद व वर्चस्वातून हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे.
आकाश उर्फ राणा मोहन कांबळे (वय २६) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी ओमकार प्रमोद मोरे (वय २३), अरूण अनिल यादव (वय २०), आदित्य ज्ञानेश्वर पिंपळेकर (वय २१) दत्ता वेंकट गीते (वय २०) यांना तात्काळ हालचाली करीत अटक केली आहे. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आदित्य प्रकाश कांबळे याच्यासह आणखी एक आरोपी मात्र फरार झाला आहे.
याबाबत फुरसुंगी पोलिस ठाण्यात रेखा प्रभाकर कांबळे (वय ४०) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार फुरसुंगीतील रूपीनगर येथील देशमुख पेट्रोल पंपाच्या मागील परिसरात रात्री दहाच्या सुमारास घडला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आकाश उर्फ राणा कांबळे व आरोपींमध्ये काही कारणावरून वाद होते. जुन्या वादातून त्यांच्यात सतत भांडण होत होते. आरोपी काहीही कामधंदा करत नसून, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.
आकाश कांबळे मंगळवारी रूपीनगर परिसरातून जात असताना सहा जणांच्या शस्त्रधारी टोळक्याने त्याला अडविले आणि एका गल्लीत भररस्त्यातच त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. टोळक्याने त्याच्या डोक्यात मानेवर, हातावर तसेच इतर ठिकाणी तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार करून त्याचा खून केला. आकाश रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. दरम्यान, या खूनाच्या थरारानंतर टोळके घटनास्थळावरून पसार झाले. तरुण तसाच रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
नागरिकांनी या घटनेची माहिती फुरसुंगी पोलिसांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी काही तासातच बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण तर पसरले होतेच, पण स्थानिक नागरिकांमध्ये वाढत्या गुन्हेगारीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. परिसरात गुन्हेगारी वाढत असून, पोलिसांनी गस्त वाढवावी. तसेच या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.






