राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस; उकाड्यातून दिल्लीकरांना दिलासा... (फोटो- सोशल मिडिया)
पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा
ऊन पावसाचा खेळ कायम राहणार
पुण्याला तीन दिवस यलो अलर्ट
पुणे: पुणे शहरात सोमवारी झालेल्या जोरदार पावसाने आणि वादळी वाऱ्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पुढील चार दिवस ऊन-पावसाचा खेळ कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून पुण्यास पुढील तीन दिवस ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.
मंगळवारी (ता. ३१) शहरात किमान तापमानात दोन अंश सेल्सिअसने घट होऊन ते १९.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, तर कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसवर स्थिर राहिले. सकाळी कडक ऊन जाणवले, मात्र दुपारनंतर वातावरण ढगाळ झाले. उपनगरांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.
बुधवारी (ता. १) कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान सुमारे २० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आकाश सकाळी निरभ्र राहून दुपारनंतर अंशतः ढगाळ होईल. तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची तर काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे.
चिखलमय रस्ते आणि वाहतूक कोंडी; पिंपरी-चिंचवडकरांना अवकाळी पावसाचा मोठा तडाखा
दरम्यान, जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह ताशी ५० ते ६० किलोमीटर वाऱ्यासह गारांचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे. पुढील पाच दिवसांत तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच पुढील काही दिवस दुपारनंतर ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि हलक्या सरींचा अंदाज कायम राहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका;
पिंपरी-चिंचवडकरांना अवकाळी पावसाचा मोठा तडाखा
अवकाळी पावसाच्या पहिल्याच सरीत पिंपरी-चिंचवड शहरातील पायाभूत सुविधांची पोलखोल झाली असून महापालिकेच्या मान्सूनपूर्व नियोजनातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि वीजपुरवठा खंडित होणे अशा समस्यांनी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.सोमवारी (दि. ३०) दुपारी मेघगर्जना आणि गारांच्या सरींसह सुमारे एक ते दोन तास कोसळलेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत केले. अनेक भागांत पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला, तर काही ठिकाणी पूर्णतः ठप्प झाला.






