Mansoon Update : प्रशासनाचा हलर्जीपणा अन् चिल्हार नदीला पूर, कर्जतमधील गावकऱ्यांनी व्यक्त केला संताप
कर्जत/ संतोष पेरणे : कोकण, मुंबई आणि उपनगर परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचं थैमान सुरु आहे. गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. अशातच आता चिल्हार नदीवर असलेल्या बंधाऱ्यावरील लोखंडी प्लेट काढल्या नसल्याने नदीला पूर आल्याचं म्हटलं जात आहे. चिल्हार नदीला महापूर आलेला पूर आल्यानंतर त्या महापुरचे पाणी अंत्राट गावामध्ये शिरले असून मोठ्या प्रमाणात स्थानिकांचे नुकसान झाले आहे.दरम्यान, शासनाच्या आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणा यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांना या सगळ्या समस्य़ांना सामोरं जावं लागत आहे.
मान्सून यावर्षी लवकरच आगमन केलं असून यंदा मे महिन्यातच पावसाला दमदार सुरूवात झाली आहे.त्यात ढग फुटी सदृश पाऊस झाल्यानंतर पहिल्याच पावसात तालुक्यातील सर्व नद्यांना पूर आले आहेत.कर्जत तालुक्यात उन्हाळयात कोरडी असलेली चिल्हार नदी एका दिवसाच्या पावसात दुथडी भरून वाहत आहे.उन्हाळयात कोरडया नदीमध्ये पाण्याचा साठा असावा यासाठी चिल्हार नदीमध्ये अंत्राट वरेडी गावाच्या हद्दीत असलेल्या के. टी.बंधारा बांधण्यात आला होता.या बंधाऱ्यांच्या लोखंडी प्लेटी पावसाळा सुरू होण्याची लक्षणे असताना काढण्यात आलेले नव्हते.त्याचा फटका स्थानिक ग्रामस्थांना बसला आहे.बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेट काढण्यात आल्या नसल्याने नागपूरचे पाणी थेट गावामध्ये घुसले आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाली.त्याचवेळी शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे नुकसान तर झालेच पुरामुळे नदीकाठावरील घरांना धोका निर्माण झाला आहे.
या बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटी वेळेवर काढल्या असत्या तर आज ही पूर परिस्थिती इतकी गंभीर नसती.अजून पूर्ण पावसाळा जायचा आहे. मोठा पाऊस झाला की प्रत्येक वेळी हीच परिस्थिती निर्माण होणार. तरी याबाबत अंत्राट वरेडी ग्रामस्थांच्या भावना शासनापर्यंत पोचतील काय? यावर शासन उपाय योजना करील काय असे प्रश्न स्थानिक शेतकऱ्यांना पडला आहे.त्या कोल्हापूर टाईप बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेट वेळेत काढल्या नाहीत आणि त्यामुळे चिल्हार नदीला आलेल्या महापुराचे पाणी गावात आणि शेत जमिनीत घुसून मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यभरात सध्या मुसळधार पावसाची सुरुवात झाली असून मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरातील वाहतूक देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्याच पावसाने मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने याचा नाहक त्रास सकाळी कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांना सहन करावा लागत आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबई आणि ठाण्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.पुढील सहा तास मुसळधार पावसाचा इशारा असून मुंबईकरांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात येत आहे. मुंबई, नवी मुंबई शहर, रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. त्याचबरोबर ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुण्यामध्ये सकाळपासून पावसाने थोडी उघडीप घेतली आहे. नागरिकांनी सतर्क रहावं असं प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे.