Raigad News: उरणकरांसाठी दिलासादायक बातमी! उरण-नवी मुंबई रेल्वे फेऱ्यांत होणार वाढ, लवकरच जाहीर होणार वेळापत्रक
२०२४ मध्ये सुरू झालेली ‘लाईफलाईन’ जानेवारी २०२४ मध्ये बेलापूर व नेरूळ स्थानकांपर्यंत उरण रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. उरण शहराला उपनगरी रेल्वे जाळ्याशी जोडणारी ही पहिलीच मोठी सोय असल्याने प्रवाशांकडून याला मोठा प्रतिसाद मिळाला. नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईकडे शिक्षण व नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरली. (फोटो सौजन्य – Pinterest)
सध्या या मार्गावर अंदाजे ४० फेऱ्या चालू असल्या तरी प्रवासीभार आणि वाढत्या मागणीमुळे अतिरिक्त सेवांची गरज निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसापूर्वीच भारतीय रेल्वे मंत्रालयाने मध्यरेल्वेला फेऱ्या वाढविण्याबाबत लेखी सूचना दिली आहे. प्रस्तावानुसार बेलापूर-उरण ६ नवीन फेऱ्या, नेरूळ-उरण ४ नवीन फेऱ्या अशा दहा अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे.
दैनिक प्रवासी मनोज ढाकूर यांनी रात्रीच्या शेवटच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. उरणमध्ये कामानिमित्त उशिरा परतणाऱ्या प्रवाशांसाठी रात्री उशिरापर्यंत गाड्या असाव्यात, यामुळे प्रवास अधिक सुलभ होईल, असे ते म्हणाले.
एकूणच, उरण नवी मुंबई मार्गावरील रेल्वेसेवा आणखी मजबूत होण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे उरणकरांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळणार असून परिसरातील कनेक्टिव्हिटीही अधिक सुलभहोणार आहे.
तरघर आणि गव्हाण या दोन्ही स्थानकांवर थांबे सुरू करण्याची सूचनादेखील देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या स्थानकांवर प्रवाशांची संख्या मोठी असल्याने बराच काळापासून रहिवासी आणि सामाजिक संघटना थांबे सुरू करण्याची मागणी करत आहेत. रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावाला हिरवा कंदील दिला असला, तरी फेऱ्या वाढविण्याची नेमकी तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. पुढील काही दिवसांतच मध्यरेल्वेकडून अधिकृत वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.






