राज्यातील अनेक भागांत वाढतोय पावसाचा जोर; अनेक जिल्ह्यांत नद्यांना पूर(फोटो- istockphoto)
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेला पाऊस आता राज्यातील काही भागांत मुसळधार होताना दिसत आहे. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. नदी, नाल्यांना पूर आला असून, नाशिक, वर्धा, अकोला, बुलढाणा, नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक आहे. यशोदा नदीला पूर आल्याने मुले अडकल्याचे दिसून आले. तिन्ही मुले डिगडोह येथील स्मशानभूमीच्या शेडमध्ये थांबले होते. नंतर त्यांना वाचवण्यात यश आले.
यशोदा नदीच्या परिसरात शेडच्या आजूबाजूला पुराच्या पाण्याचा विळखा आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी देवळीचे तहसीलदार समर्थ क्षीरसागर दाखल झाले होते. मुलांना पुरातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बचाव पथकाचे कर्मचारी व देवळी येथील अग्नीशामक दलाचे कर्मचारी उपस्थित झाले. पुरात अडकलेल्या भावेश अमोल कापसे (वय १५, रा डीगडोह), उमेश रामदास साखरकर (वय ३८, रा. नागझरी), प्रज्वल पंडित सावरखेडे (वय ४०, रा नागझरी) या तिघांना वाचवण्यात आले आहे. तर एक दुचाकी आणि एक सायकल पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.
दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर केंद्राकडून विदर्भात पुढील चार दिवस नागपूरसह संपूर्ण विदर्भात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे मान्सून आणखी सक्रीय होऊन विकेंडपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे.
बुलढाण्यात कालवा फुटून शेतीत पाणी
बुलढाणा जिल्ह्यात संततधार पाऊस होत असल्याने मेहेकर तालुक्यातील मारोती पेठ येथील लघु प्रकल्प तुडुंब भरला आहे. तसेच तालुक्यातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर काही ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. मारोती पेठ येथील लघु प्रकल्पाचा कालवा फुटल्याने असंख्य शेतकऱ्यांच्या शेती खरडून गेल्या आहेत. पेरणी झालेल्या शेती वाहून गेल्या आहेत. काही भागात पावसाने कहर केला आहे.
विदर्भात पावसाला सुरुवात
सलग दुसऱ्या दिवशी अकोला शहरासह जिल्ह्यात पावसाची जोरदार रिपरिप सुरू आहे. मात्र, बुधवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस पिकांना नवसंजीवनी देणारा आहे. पावसामुळे शहरातील सकल भागात पाणी साचले आहे. २९ जूनपर्यंत पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि अकोला या जिल्ह्यात पावसाचा इशारा आहे.






