इस्लामपूर : देखण्या स्वागत कमानी, फुलांचा दरवळ प्रसादाचा घमघमाट, भगवे फेटे, टोप्या घातलेल्या तरुणांचे शिस्तबद्ध जत्थे, मुखी प्रभू श्रीरामाचा अखंड जयघोष, नभात तळपणाऱ्या सूर्यनारायणाची बाह्य ऊर्जा अन् भक्तांच्या अंतरातील चैतन्य जागविणारी अंतरऊर्जा यांचा दैवीसंगम अशा श्रद्धेच्या अपूर्व सत्संगात इस्लामपूर शहरात अयोध्येतील राम मंदिरात पार पडलेल्या रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजातर्फे श्रीरामाची महाआरती झाली. शहरातील ४२ समाजातील २५० उभयतांच्या हस्ते ही आरती करण्यात आली. त्यामुळे इस्लामपुरात अवघे रामराज्य अवतरल्याचे दिसून आले.
अयोध्येत रामजन्मभूमी येथे मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गेल्या पाचशे वर्षापासून चाललेल्या हिंदू जनतेच्या संघर्षाचा विजय झाला. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दिवशी दिवाळी साजरी करा व दिवे लाऊन महाआरती करा, असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत इस्लामपूर शहरात सकल हिंदू समाजातर्फे येथील यल्लमा चौकात दुपारी साडेबारा वाजता भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील ४२ समाजातील प्रत्येकी पाच आशा २५० उभयंत्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, माजी आ.भगवानराव सांळुखे,माजी नगरसेवक बाबासाहेब सूर्यवंशी, एल.एन.शहा, वैभव पवार,भास्कर कदम, सुभाष शिंगण, मंगल शिंगण, सतीश महाडिक, अमित ओसवाल, संजय भागवत, राजेश मंत्री, भाजपाचे शहर अध्यक्ष अशोकराव खोत, उपाध्यक्ष भास्कर मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय लाखे,भाजपा जिल्हा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा आशाताई पवार, प्रकाश शिक्षण मंडलाचे अध्यक्ष संजय जाधव, अजित पाटील, अक्षय पाटील, भाऊ पाटील, प्रवीण परीट, प्रमोद मोरे, अर्जुन पाटील, धनाजी पाटील, विकास परीट, विश्वजीत पाटील आदींसह शहरातील महिला वर्ग, सर्व धर्मातील रामभक्त, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाआरतीनंतर फटाक्यांची आतषबाजी
प्रारंभी अनिल इनामदार यांच्या हस्ते विधीवत पूजा झाली. तानाजी घोरपडे व त्यांच्या सुविद्य पत्नी विमल घोरपडे या उभयंत्याना पूजेचा मान मिळाला. महाआरतीनंतर फटाक्यांची आतषबाजी झाली. यावेळी जय श्रीरामचा जयघोषाने संपूर्ण इस्लामपूर शहर राममय व भक्तिमय बनले होते.
पताका आणि झेंड्यांनी शहर भगवे
श्रीराम नवमीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आयोजकांनी तयारी सुरु केली होती. सोमवारी शहरातील सर्वच रस्त्यांवर भगव्या पताका आणि झेंडे लावण्यात आले होते. तसेच घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. सकाळपासून रामभक्त दुचाकीवर भगवे झेंडे लावून वातावरण निर्मिती करीत होते.
हजारो भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
महाआरती झाल्यानंतर यल्लमा चौकात सकल हिंदू समाजातर्फे रामभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो रामभक्तांनी याठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला.