किनारी वाऱ्यांमुळे जाळे रिकामे (फोटो- istockphoto)
किनारी वाऱ्यांमुळे मासेमारी व्यवसाय संकटात
आर्थिक गणित कोलमडल्यामुळे चिंता
पुढील तीन ते चार दिवस समदात स्थिती कायम
गुहागर: समुद्रात उत्तरेकडून वाहणाऱ्या जोरदार थंड वाऱ्यामुळे मासळी स्थलांतरित झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. गेल्या चार दिवसांपासून मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या बोटींना रोजच्या खर्चाइतकीही मासळी मिळत नसल्याने मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार मासेमारी नौकांद्वारे हा व्यवसाय चालतो.
या व्यवसायावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असून मासळी व्यवसायाशी संबंधित बर्फ उद्योग, वाहतूक, विक्री आदी पूरक व्यवसायही यावरच चालतात. मात्र कधी परप्रांतीय नौकांकडून होणाऱ्या अनधिकृत मासेमारीमुळे, तर कधी निसर्गातील अचानक बदलांमुळे हा व्यवसाय संकटात सापडतो.
मच्छीमार व्यवसायाकरिता अद्ययावत, प्रशस्त जेट्टीची मागणी; मंत्री नितेश राणेंना दिले निवेदन
उत्तरेकडून जोरदार थंड वारे; मासळीचे स्थलांतर
गेल्या चार दिवसांपासून समुद्रात उत्तरेकडून जोरदार थंड वारे वाहत असल्याने मासळीने स्थलांतर केले आहे. परिणामी जाळ्यात मासळी मिळत नसल्याने मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या बोटींना तोटा सहन करावा लागत आहे. अनेक वेळा खर्चाच्या तुलनेत उत्पन्न शून्य असल्याने नौकामालकांवर आर्थिक बोजा वाढला आहे.
नौका बंदरातच नांगरून ठेवण्याला दिले प्राधान्य
मासेमारी करताना नौकांना इंधन, खलाशांसाठी रेशन व पाणी, तसेच खलाशांचे साप्ताहिक वेतन असा मोठा खर्च करावा लागतो. मात्र मासळीच न मिळाल्याने हा खर्चही वसूल होत नसल्याने मच्छीमार अडचणीत आले आहेत. यामुळे परिस्थिती निवळेपर्यंत अनेक मच्छीमारांनी आपापल्या नौका बंदरातच नांगरून ठेवण्याला प्राधान्य दिले आहे.
पुढील तीन ते चार दिवस समुद्रात स्थिती कायम
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवस समुद्रातील हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असून, त्यामुळे मासेमारी व्यवसायावर आणखी परिणाम होण्याची भीती मच्छिमार व्यक्त करत आहेत.
मंत्री नितेश राणेंना दिले निवेदन
मंडणगड तालुक्यातील किनारी भागात असलेल्या वाल्मिकीनगर येथे मच्छिमार व्यवसायाकरिता अद्यावत व प्रशस्त जेट्टीची निर्मिती करण्याची मागणी फिशरीज वेलफेअर फौंडेशनचे अध्यक्ष सुनील खाडे, उपाध्यक्ष हेमंत सालदुरकर यांनी बंदरविकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली असून त्या मागणीच्या अनुषंगाने संबंधित महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने कार्यवाही सुरु असल्याची माहिती फिशरीज वेलफेअर फौंडेशनचे अध्यक्ष सुनील खाडे यांनी दिली, फिशरीज वेलफेअर फौंडेशनचे अध्यक्ष सुनील खाडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, अरबी समुद्र आणि सावित्री नदीच्या संगमानजिक असलेले वाल्मिकीनगर या गावातील मत्स्यव्यवसाय हा पारंपारिक व्यवसाय असून येथील जवळपास सर्वच कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन मत्स्यव्यवसाय हा आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






