Photo Credit : Team Navrashtra
मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर मुस्लीम समाजातील काही संघटनांनी रविवारी (11 ऑगस्ट) आंदोलन केले. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मुस्लीम संघटनेच्या आंदोलकांनी यावेळी केली. पण मातोश्रीबाहेर दंगा करणारी माणसे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होती असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज सकाळी माध्यमांशीबोलताना त्यांनी आंदोलनातील लोकांचे एकनाथ शिंदेंसोबत असलेले फोटोही दाखवले.
हेही वाचा: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात; फेसबुकवरून उमेदवारीची घोषणा
संजय राऊत म्हणाले, सुपारीचे सगळे खेळ हे वर्षा बंगल्यावरून खेळले जात आहेत. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गँग चालवल्या जातात. हे सर्व भाडोत्री लोक आहेत. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकासाठी मातोश्री निवासस्थानाबाहेर मुस्लीम समाजातील लोकांनी आंदोलन केले. पण काही कारणच नव्हते. कारण या विधेयक आणि त्यातील सुधारणांवर अजून संसदेतच चर्चा व्हायची आहे. अहमदशहा आब्दाली महाराष्ट्रात मराठी माणसात भांडणे लावायचा प्रयत्न करत आहे. त्याला हे सुपारीबाज बळी पडत आहेत.
तुम्ही आम्हाला बघून घेऊ अशा धमक्या देत आहात, मग महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावतोय, महाराष्ट्राची लूट करतोय त्या अहमदशहा आब्दालीला आव्हान द्या, आम्ही समर्थ आहोत. तुमच्यात हिंमत असेल तर अहमदशहा आब्दालीला आव्हान द्या, असे खुले आव्हान संजय राऊत यांन दिले आहे.
हेही वाचा: मराठा ठोक मोर्चाचा इशारा; शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी मातोश्रीबाहेर आंदोलन करणाऱ्यांचे फोटो दाखवत मोठे दावेही केले. एक फोटो दाखवत संजय राऊत म्हणाले, सलमान शेख हा मातोश्रीच्या बाहेर होता. हेच महाशय कोणासोबत आहेत, हे पाहा. हा अपरार सिद्धीकी हाही मातोश्रीबाहेर घोषणाबाजी करत होता. एलीयास शेख कोणासोबत आहेत हेही पाहून घ्या, हे अकरम शेख कोणासोबत आहेत, जिशान चौधरी यांना तर माहात्मा म्हणावे लागेल. हेतर वर्षा बंगल्यावर मिसेस मुख्यमंत्र्यांसोबत दिसत आहेत. म्हणजे हे सगळे भाडोत्री लोक आहेत. म्हणजे संपूर्ण फॅमिलीच सुपारीबाज आहे. अशी जहरी टीकाही संजय राऊत यांनी केली.