बीड : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची परळी येथे होणाऱ्या संवाद बैठकीस तात्काळ परवानगी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यात परवानगी देत असताना कोर्टाने जरांगे यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांना गावबंदीचे आवाहन न करण्याचे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कुठलेही वक्तव्य न करण्याचे आदेश दिले आहेत.
बीडच्या परळी वैजिनाथ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मार्केट यार्डात मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अनुषंगाने आयोजकांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू असून, जात, धर्म, भाषेवर एकत्र येऊ नयेत असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले असल्याचे म्हणत पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे आयोजकांनी थेट न्यायालयात धाव घेतली आणि अखेर त्यांना बैठकीला परवानगी मिळाली.