कोल्हापूर : इचलकरंजी मतदारसंघातील कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदावरून हकलपट्टी केली असून नूतन जिल्हाप्रमुख म्हणून संजय चौगुले यांची निवड केली आहे तर वैभव उगळे यांनाही दोन मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत घेण्याबाबत ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी विरोध केला. शेट्टी यांनी वारंवार भूमिका बदलत शिवसेनेला फाट्यावर मारले असल्याची खदखद शिवसैनिक जाधव यांनी मागील दोन दिवसात बोलून दाखवली होती.
मात्र, हीच खदखद बोलून दाखवल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जाधव यांच्यावर कारवाई करत जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली आहे. नूतन जिल्हा प्रमुख म्हणून वैभव उगले व संजय चौगुले नवीन जिल्हाप्रमुख नेमण्यात आले आहेत. संजय चौगुले हे माजी आमदार सुजित मिंणचेकर यांचे निकटवर्तीय आहेत.
कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना
निष्ठावंत शिवसैनिकाला मातोश्रीवरून अशी वागणूक दिल्यानंतर जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहे. राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत घेण्याबाबत मुरलीधर जाधव यांनी विरोध दर्शविला होता. असे असले तरी शेवटी त्यांना पद मुक्त व्हावे लागले आहे.