Lakshman hake - Manoj Karange
छत्रपती संभाजीनगर : आरक्षण ही काही खिरापत नाही, ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा घाट महाराष्ट्रात घातला जातो आहे. कुणबी प्रवर्ग हा वेगळा प्रवर्ग आहे फक्त कुणबी नोंदी असतील तर त्यांना आरक्षण देण्यापासून कुणी रोखू शकत नाही, पण मराठा कुणबी आणि कुणबी मराठा शोध लावून महाराष्ट्रात प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम सुरु आहे, अशा शब्दांत ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंना प्रत्युत्तर दिले आहे.
ज्यांच्या कायदेशीर नोंदींही नाहीत त्यांनाही आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे घटनेने दिलेले १६ टक्के आरक्षण रद्द करा, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर हाकेंनी जरांगेंवर पलटवार करत त्यांना उत्तर दिले आहे. ‘कुणबी हा वेगळा प्रकार आहे. खान्देशी कुणबी, काळे कुणबी, वऱ्हाडी कुणबी, कोकणी कुणबी, तलेरी कुणबी, खैरे कुणबी, घाटोळे कुणबी. हे खरे कुणबी आहेत आणि त्यांचे सर्व रीतिरिवाज वेगवेगळे आहेत. हे कुणबी मराठा समाजाच्या व्यतिरिक्त आहेत. पण ‘कुणबी’ या एक घेऊन ज्या गोष्टी सुरू आहेत त्या सर्व चुकीच्या आहेत.
मनोज जरांगे यांना मंडल आयोग आणि ओबीसींबाबत काहीच माहिती नाही. राज्य मागासवर्गीय आयोग संपूर्ण अभ्यांस केल्यानंतरच एखाद्या जातीचा समावेश करतो. मागासवर्गाला तो अधिकार आहे. मराठा समाजातील तरुणांना माझी विनंती आहे की जर प्रगती करायची असेल, चांगलं जीवन जगायचं असेल आरक्षण हा एकमेव पर्याय नाही.
आरक्षण हे खिरापत वाटण्याचा, आर्थिक उन्नतीचा कार्यक्रम नाही, आता दहा टक्के दिलेले आरक्षणातील सर्वेक्षण १०० टक्के बोगस आहे, असा गंभीर आरोप लक्ष्मण हाकेनी यावेळी केला. कोणीतरी माणूस उठतो आणि वेठीस धरतो आणि सरकारही जरांगेंना एंटरटेन करत आहे. ओबीसी आरक्षणात अशाच जाती घातल्या, ओबीसी असेच आले, त्यांचे कुठले सर्वेक्षण झालेले नाही, अशी वक्तव्ये कुठल्याच नेत्याने करू नये,” असे आवाहन हाकेंनी केले.
कुणबी नोंदींची श्वेत पत्रिका दाखल करा. जरांगेंच्या स्टेटमेंटने ओबीसींच्या मनात भिती निर्माण होणार नाही का? मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत नाही. संविधानाने बोलतो. जरांगे यांच्या मागणीचा हेतू राजकीय असू शकतो. 288 विधानसभा लढवून काय करणार, तुमचे आमदार कमी आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.