देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत रोहित पवारांचा ही पोलिसांवर गंभीर आरोप
Rohit Pawar on Devendra Fadnavis: शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी, “महाराष्ट्र पोलिसांसारखा इतका अकार्यक्षम विभाग जगात कुठेही नाही. पोलिसांनी ५० लाख रुपये जप्त केल्यानंतरही पोलिस फक्त ५०,००० रुपये दाखवतात.” असे वक्तव्य केले होते. संजय गायकवाड यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून गंभीर आरोप केले.
रोहित पवार म्हणाले की, आमदार संजय गायकवाड यांनी जे सांगितले ते चुकीचे आहे, असं अजिबात नाही. त्यांनी सांगितले की, ते म्हणाले की 50 लाखांचा पोलिसांना माल सापडला तर ते दाखवताना कमी दाखवतात आणि वरचे पैसे घेतात. त्यांना माहिती आल्याशिवाय ते बोलणार नाही. गायकवाड आरोप करत असलेले पोलिस अधिकारीला शोधून काढा. देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, नेरुळमधील ड्रग्ज प्रकरणात एफआयआर दाखल झाली पाहिजे. कारण या प्रकरणात पोलीस प्रशासनातील लोकं सहभागी आहेत. ११०० ते १२०० कोटी रुपयांचा करार आहे. प्रत्यक्ष रक्कम वेगळी दाखवली जाते. यामध्ये पोलिस प्रशासन सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, आमदार संजय गायकवाड पोलिसांबाबतच्या त्यांच्या विधानांवर ठाम आहेत. मी पोलिसांची दिलगिरी व्यक्त केली. मात्र माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून वक्तव्य केलं असून मी मझ्या वक्तव्यावर ठाम आहे, असे त्यांनी म्हटलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन केला आणि या विषयावर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.
तसेच विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्यामुळे लाडक्या बहिणी २१०० रुपयांसाठी प्रतीक्षेत असतानच, राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाल एक विधान केलं की, “लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे कुणीही सांगितले नाही,” असे वक्तव्य करत या मुद्द्यावर घूमजाव केला आहे. याबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले की, भाषणात अनेक नेते बोलले होते की पैसे वाढवून देऊ. आता महिला म्हणत आहेत की, निवडणुका ज्यावेळी होत्या त्यावेळी 2 महिने आधी पैसे दिले. आता, मात्र आमच्या हक्काचे पैसे दिले नाही. म्हणजेच यांनी केवळ मतांसाठी आमचा वापर केला, असे म्हणत त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.