कुंडल वन अकादमीमध्ये विषबाधा
पलूस: कुंडल ( ता. पलूस ) येथील वनविभागाच्या प्रशिक्षण केंद्रात सुमारे ६५ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील रुग्णांवर पलूस येथील ग्रामीण रुग्णालय व कुंडल येथील आरोग्य मंदिर तसेच सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वनप्रशिक्षण केंद्र, चिखलदरा ( अमरावती) येथील ११० प्रशिक्षणार्थी व सहाय्यक व इतर अधिकारी ८ असे ११८ जण कुंडल येथील वन अकॅडमीला भेट देणेसाठी सोमवारी संध्याकाळी आले होते.
तत्पूर्वी त्यांचा दिनांक १७ फेब्रुवारीपासून संभाजीनगर, जुन्नर, ओझर, बनेश्वर येथील वनउद्यान, इकोबटालीयन प्लांटेशन, रोपवाटीका, बिबट्या उपचार केंद्र व तत्सम ठिकाणी भेट देऊन बनेश्वर (ओझर) येथून सोमवारी सकाळी निघाले होते. निघताना दुपारच्या जेवणाचे पार्सल बरोबर घेतले होते. ते सर्वांनी दुपारी रस्त्यामध्ये खाल्ले त्यानंतर ते संध्याकाळी कुंडलमध्ये आले येथून आज पुढे राधानगरी येथे जाणार होते.
रात्री कुंडल वनप्रबोधिनी मध्ये स्थानिक प्रशिक्षणार्थी व अमरावतीहून आलेले प्रशिक्षणार्थी या सर्वांनाच शाकाहारी व मांसाहारी जेवण केले होते. एकूण जवळपास पाचशे जणांनी जेवण केले मात्र त्यापैकी फक्त अमरावतीहुन आलेल्याच प्रशिक्षणार्थीं पैकी काहींना पहाटे जुलाब, व उलट्यांचा त्रास सुरु झाला तात्काळ कुंडल येथील आरोग्य उपकेंद्र मध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय पाटील व त्यांच्या पथकाने तात्काळ अन्नातील विषबाधित रुग्णावर उपचार सुरु केले. व गंभीर असलेल्या नेहा पिंगळे, समिका मंचेकर, स्नेहल शिंदे, अरुणा झुंबे, ज्ञानेश्वरी शिंदे, गीता कोकणे, पद्मिनी शिंदे, अंकिता गोपन यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पलूस ग्रामीण रुग्णालयात २१ जणांना दाखल केले आहे. व कुंडल येथील आरोग्य उपकेंद्र मध्ये अरुण सिंगल, निलेश सोळंके, लक्ष्मी उईके, व्यंकटेश शिंदे, ज्योतीराम शेळके, जयपाल टेकनोट, चेतन वाघमारे, संजय धर्माधिकारी, सुशील सोनवणे, मिथुन राठोड, सोनाली पावरा, सोनल सांगळे, प्रदीप कोराडे, भूमिका भोई, वैशाली चव्हाण, जालिंदर थोरात, अनिल बोडके, सागर परदेशी, महेश पाटील, अभिजीत पाटील, अजय गायकवाड, ऋषिकेश लवाटे, सागर काळे, नारायण उगले, सुभाष गायकवाड , प्रकाश वाघमारे, प्रभाकर चिकाटे, गोरक्ष भांबरे, हिराचंद्र बोरे, ऋषिकेश ढाकणे, अभिषेक खांबे, सेजल परदेशी, पंढरीनाथ खताळे, लक्ष्मीकांत हिंगे, नंदकिशोर सोळंकी, प्रीत जाधव, नितीन नवघरे, सायली टोणपे, सोनाली हासे असे ३९ जण वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली उपचार घेत आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश जुगळे व आरोग्य पर्यवेक्षक कुलदीप डुकरे यांनी कुंडल येथील आरोग्य मंदिरास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कुंडल येथे उभारण्यात आलेल्या वन प्रबोधिनी मध्ये सदर घटनेचे गांभीर्य ओळखून माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना आत सोडण्यास अटकाव करण्यात आला. याठिकाणी कोणीही अधिकारी हजर नसल्याचे सांगण्यात आले.