पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ढकलली पुढे; आता 22 फेब्रुवारीला घेतली जाणार परीक्षा (फोटो - istock)
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा 8 फेब्रुवारीला आयोजित केली जाणार होती; मात्र, त्याच दिवशी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) होणार असल्याने दोन्ही परीक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला. त्यामुळे अनेकांकडून वेळापत्रक बदलण्याची मागणी होत होती.
वेळापत्रक सातत्याने बदलण्याची मागणी होत होती. असे असताना आता या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख पुढे ढकलत 22 फेब्रुवारी 2025 अशी जाहीर केली आहे. परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वीप्रमाणे इयत्ता चौथी व सातवीसाठी घेण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी विशेष बाब म्हणून चौथी, पाचवी, सातवी आणि आठवी अशा चारही वर्गांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.
दरम्यान, राज्यभरातील सर्व परीक्षा केंद्रांवर एका दिवशी ही परीक्षा घेतली जाईल. नवीन वेळापत्रकानुसार परीक्षेची तयारी आणि नियोजन करण्याचे आवाहन परीक्षा परिषदेने शाळांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना केले आहे.
विद्यार्थ्यांना मिळतो आर्थिक आधार
राज्यातील हजारो विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकांत मोडतात आणि त्यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना शिक्षणासाठी मोठा आधार ठरते. आर्थिक अडचणीमुळे गळती होत असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी सकारात्मक चालना देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. शाळांच्या माध्यमातून आणि पालकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली असताना तारखेत झालेल्या बदलामुळे त्यांना अधिक अभ्यासासाठी वेळ मिळणार आहे, ही विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक बाब आहे.
हेदेखील वाचा : 2027 पर्यंत TET उत्तीर्ण करणे बंधनकारक! राज्यभरातील शिक्षकांची धाकधूक वाढली, आज परीक्षेचा दिवस






