पुण्यातील रावेत–बाणेर मार्गावर भीषण वाहतूक कोंडी वाहने अडकली (फोटो - सोशल मीडिया)
Pune News : पिंपरी: मुंबई–बंगळुरू महामार्गावरील रावेत ते बाणेरदरम्यान गुरुवारी सकाळच्या गर्दीत वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली. विशेषत: वाकड परिसराजवळील भूमकर चौक, भुजबळ चौक आणि मुळा नदीवरील पुलाकडे जाताना वाहनांचे अक्षरशः सर्पिल अशा रांगा लागल्या होत्या. अनेक वाहनचालक सकाळीच या कोंडीत अडकले आणि पुढे जाण्यासाठी त्यांना थांबणे, सिग्नल अडथळे आणि धीम्या गतीने सरकणाऱ्या ताफ्यातून वाट काढावी लागली. काही ठिकाणी तर दोन–तीन वाहने सरकण्यासाठी पाच–दहा मिनिटांचा अवधी लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
कोंडीचे प्रमाण वाढण्यामागे स्थानिकांनी काही ठोस कारणेही अधोरेखित केली आहेत. रखडलेले रस्ता रुंदीकरण, अरुंद मुळा नदीवरील पूल, दोन्ही चौकांमधील वाढलेली वाहतूक, त्यातच सेवा रस्त्यांवरील अतिक्रमण यामुळे मुख्य वाहतूक प्रवाह स्वतःच गुदमरल्यासारखा वाटत असल्याचे नागरिकांचे मत आहे. विशेषत: भुजबळ चौक हा हिंजवडी आयटी पार्क, औद्योगिक पट्टा आणि पुणे–मुंबई महामार्ग यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात वाहने या मार्गावरून धावतात. वाढत्या आयटी कंपन्या, निवासी प्रकल्प आणि व्यावसायिक आस्थापनांमुळे गेल्या काही वर्षांत या रस्त्यावरील वाहनभार सातत्याने वाढत चालला आहे.
हे देखील वाचा : रत्नागिरीत महिलाराज! Local Body Election मध्ये 52 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचे मतदान
२६ किलोमीटर एलिव्हेटेड कॉरिडॉरची योजना कागदावरच
रावेत ते नऱ्हेदरम्यान सहापदरी २४ किमी एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्याची योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, या प्रकल्पामुळे कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्ष कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही.
रावेत–वाकडदरम्यान सेवा रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्याचा प्रस्ताव असला तरी भूसंपादनाचा प्रश्न न सुटल्याने हे काम थांबलेल्या अवस्थेत आहे. महामार्ग प्राधिकरण आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यातील समन्वयाच्या उशिरीचा फटका नागरिकांना बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
भुयारी मार्ग व रुंदीकरणाच्या विलंबाने समस्या तीव्र
बाणेर–रावेत मार्गावरील भुयारी मार्गाचा विस्तार आणि रस्ता रुंदीकरणाचा विलंब हा या संपूर्ण परिसरातील कोंडीचा मुख्य मुद्दा आहे. भूसंपादन प्रक्रियेला गती देऊन रुंदीकरणाचे काम तातडीने पूर्ण झाले, तर कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. वाहतूक नियोजन सुधारून अडथळे दूर केल्याशिवाय येथील परिस्थिती बदलणार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
हे देखील वाचा : ‘यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या 175 जागा आल्या तर भाजपने…’; विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
कोंडी वाढवणारे अडथळ्यामध्ये काही कारणे समोर आली आहेत. यामध्ये भुयारी मार्गालगत उभी असलेली अनधिकृत दुकाने, अनधिकृत रिक्षा थांबे, रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या केल्या जाणाऱ्या गाड्या, अवैध खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा त्रास आणि रस्त्यालगत फळ विक्रेते आणि त्यांची वाहने यामुळे नाहक वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे.
याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहशहर अभियंता बापू गायकवाड यांनी मत मांडले. ते म्हणाले की, “महापालिका हद्दीतील बहुतांश काम आम्ही पूर्ण केले आहे. मात्र महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यांचे रुंदीकरण भूसंपादन न झाल्याने प्रलंबित आहे. ज्या ठिकाणी भूसंपादन पूर्ण झाले, तेथे लवकरात लवकर काम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”






