संग्रहित फोटो
पुणे :”बीड आणि इतर भाग शांत झाला पाहिजे. मी इथे येण्याच्या आधी मुख्यमंत्री फडणविसांशी फोनवरून चर्चा केली. ही परिस्थिती शांत झाली पाहिजे. राजकिय विचार वेगळे असतील पण महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच. एकट्या मुख्यमंत्र्यांची ती नाही” असं ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. दिल्ली साहित्य संमेलनातील भाषणांचा पुस्तक प्रकाशन सोहळा पुण्यात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिशय अस्वस्थ अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. बीड तसेच परभणी येथील विषय कसा शांत करता येईल याबाबत चर्चा सुरू आहे. जिवाभावाने एकत्र राहणारे माणसं आज एकमेकांशी शत्रूपणाने वागत आहे. अनेक गावात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. आज माझी इथ येण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाली. राजकारणात काही मतभेद असतील पण अशी स्थिती राज्यात होऊ द्यायची नाही आणि हे काम कोणा एकट्या दुकट्याच नाही तसेच मुख्यमंत्री एकटे देखील करू शकत नाही. राज्यातील जाणकार जेव्हा या विषयाला शेवटच्या माणसाला पोहचवतील तेव्हा नक्कीच महाराष्ट्र हा शांत होईल. तसेच महाराष्ट्राला पूर्वस्थितीला आणायचे आहे आणि संकटग्रस्त लोकांना या संकटातून बाहेर आणायचं आहे, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
सरहद पुणे व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने साहित्य परिषद येथे दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा साहित्यिकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत. यावेळी झालेल्या भाषणात पवारांनी परभणी आणि बीड येथील घटनेवर चिंता व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे हे देखील उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे म्हणाले की, शरद पवारांनी फुले, शाहु, आंबेडकारांचा विचार पुढे नेण्याचे काम केल आहे. शरद पवारांनी जशी ना. धो. महानोरांना विधानपरिषदेवर संधी दिली तशी पंडीत जवाहरलाल नेहरुंनी कवी दिनकर यांना राज्यसभेवर संधी दिली होती. पंडीत नेहरु अनेक कवी संमेलनांना जात असत. आताच्या पंतप्रधानांबाबत बोलण्याची माझी अजिबात इच्छा नाही. संमेलनाला कोणी जावे तर ज्याला साहित्य समजते, कविता समजते.तर एकदा पंडीत नेहरुंना कवी संमेलनाला आमंत्रीत करण्यात आलं. स्टेजवर जाताना पंडित नेहरुंचा पाय घसरला तेव्हा कवी दिनकर यांनी त्यांना पकडून ठेवलं आणि पडण्यापासुन वाचवलं तेव्हा पंडीत नेहरु म्हणाले की कवीराज राजकारणात जर माझ्यासकट कुठल्याही राजकारण्याचा पाय घसरला तर आम्हाला असेच सावरा आणि पंडीत नेहरुंनंतर साहित्यिकांना जर असं सांगण्याच धाडस जर कोणात असेल तर ते शरद पवारांमधे आहे. अस म्हणत कसबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.