सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा जोरदार सुरू असून 5 जुलै रोजी विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येत आहेत. शाळेतील इयत्ता पहिलीपासून हिंदी किंवा इतर भाषा सक्तीचा शासन आदेश मागे घेण्यात आल्यानंतर ठाकरे बंधूंकडून आवाहन करण्यात आलेला मोर्चा रद्द करण्यात आला. मात्र, 5 तारखेला मराठीच्या मुद्द्यावरुन विजयाचा जल्लोष केला जाणार आहे. यावरुन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
शरद पवार म्हणाले, राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाबाबत आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी सागितले आहे की, आम्ही सहभागी होत आहोत. त्यांनी निर्णय घेतला म्हणजे झालं. पण मी जाणार नाही. माझे इतर नियोजित कार्यक्रम आहेत, त्यामुळे मी ५ तारखेला कार्यक्रमात सहभागी होणार नाही, असे पवार यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून दोन मतप्रवाह आहेत यावर बोलताना त्यांनी काही लोक मलाही भेटले. मात्र इथल्या लोकप्रतिनिधींना कोणाचे आदेश असतील, त्यांनी त्याची अंमलबजावणी केली असेल, असे सांगून विषय टोलवून लावला.
… तर शक्तीपीठाबाबत राजू शेट्टींना पाठिंबा
कर्जमाफी बाबतची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. त्यामुळे याबाबत विरोधकांना जाब विचारणे योग्य नाही. शक्तिपीठबाबत बोलताना त्यांनी मला याची सविस्तर माहिती नाही, मात्र पुणे जळगाव हायवे उत्तम झाला आहे. फक्त अनेक ठिकाणी काम सुरू आहे, त्यामुळे अडचण आहे, या महामार्गसाठी जागा देण्याचे प्रश्न सुटत आहेत, याबाबत काही अडचणी असतील तर याबाबत मुख्यमंत्री याच्याकडून समजून घेऊ. योग्य असेल तर योग्य करू, नाही तर राजू शेट्टी यांना पाठिंबा देऊ असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
हे सुद्धा वाचा : पुरंदर तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस; सिटी सर्व्हे रद्द होणार?