सौजन्य - नवराष्ट्र टीम
बारामती : भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कारखान्याच्या हितासाठी आम्ही पृथ्वीराज जाचक यांना पाठिंबा दिला होता, मात्र त्यांनी जाहीर केलेल्या पॅनल मध्ये आमच्या पक्षातील कोणत्याही उमेदवाराला संधी दिली नाही, किंवा यादी तयार करताना आम्हाला विश्वासात घेतले नाही, या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाने तटस्थ भूमिका घेऊन छत्रपती कारखान्याच्या निवडणूक प्रचारामध्ये कोणाच्याही बाजूने अथवा विरोधात भूमिका घेणार नसल्याचे शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष ॲड तेजसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय श्री जय भवानीमाता पॅनेलच्या उमेदवारांची यादी शुक्रवारी (दि २) जाहीर केली. या पार्श्वभूमीवर ॲड तेजसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती शहर कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करून पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी ॲड तेजसिंह पाटील म्हणाले, छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या हितासाठी हा कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे व श्रीनिवास पवार यांनी पृथ्वीराज जाचक यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला होता. कारखान्याच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून त्यांनी जाचक यांना पाठिंबा दिला होता. सर्वपक्षीय असलेल्या श्री जय भवानी माता पॅनेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एकालाही उमेदवारी दिलेली नाही. सदर उमेदवारांची यादी निश्चित करताना आमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता सदर यादी निश्चित करण्यात आली. त्यामुळे आमचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
मात्र या निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या कार्यकर्त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. होणाऱ्या छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमचे कोणतेही पदाधिकारी अथवा कार्यकर्ते सहभागी होणार नाहीत. आम्ही कोणाच्या बाजूने अथवा विरोधात प्रचार देखील करणार नाही. या निवडणुकीत तटस्थ भूमिका आमच्या पक्षाची राहणार आहे. मात्र मतदानामध्ये सदसद विवेक बुद्धीला स्मरून योग्य उमेदवारांना आम्ही मतदान करू, असे ॲड तेजसिंह पाटील यांनी सांगितले.