मुंबई : उद्या अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर उद्घाटन (Ram Mandir Inauguration) सोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी राज्याच्या राजकारणामध्ये श्रेयवादाची लढाई रंगताना दिसत आहे. ठाकरे गट (Thackeray group) व भाजपमध्ये (BJP) कारसेवेवरुन कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘दैनिक नवभारत’ मधील जुना फोटो शेअर करत आठवणींना उजाऴा दिला. मात्र आता यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सवाल उपस्थित केला आहे. तुम्ही नागपूर स्टेशनवरून पुढे पोहचला का? अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी फडणवीसांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोवर आक्षेप घेत त्यावर फडणवीसांना घेरले. संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशीद पाडण्यामध्ये शिवसेनेच्या सहभागाविषयी प्रश्न उपस्थित केले हे अत्यंत हास्यास्पद आणि पोरकटपणाचे आहे. अयोध्येच्या लढ्यामध्ये शिवसेनेचे योगदान विचारणं हे कोत्या आणि संकोचित मनोवृत्तीचं लक्षण आहे. अयोध्येतील शिवसेनेचं योगदान समजण्याएवढं देवेंद्र फडणवीसांचं वय नव्हतं,” असा टोला संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला.
संजय राऊत हे फडणवीसांच्या व्हायरल फोटोवर सवाल उपस्थित करत म्हणाले, “तुम्हाला पुरावा देण्याची गरज नाही. तुम्ही कोण आहात? तुमचे लोक पळून गेले होते. शेवटी बाळासाहेब ठाकरेंनी बाबरीची जबाबदारी घेतली. तुम्ही नागपूर स्टेशनवरून पुढे पोहचला का? आपण सगळे नागपूर स्टेशनला फिरण्यासाठी गेला असाल. पण, आमच्याकडे प्रत्यक्ष बाबरीच्या घुमटावरील फोटो आहेत,” अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांवर फोटोवरुन टोला लगावला.
शिवसेनेच्या कारसेवेच्या पुराव्याचे भव्य प्रदर्शन
शिवसेनेकडे अयोध्येतील लढ्यावेळी सहभागी झालेले अनेक पुरावे असल्याचा दावा केला जात आहे. याचे प्रदर्शन भरवण्यात आले असून फडणवीसांनी तिथे भेट द्यावी, असे देखील राऊत म्हणाले. “शिवसेनेच्या सहभागाविषयी ‘डेमोक्रोसी क्लब’ला प्रदर्शन भरवलं आहे. पोलीस स्टेशन, आमच्यावर झालेल्या कारवाया आणि न्यायालयात हजर राहिलेले पुरावे आमच्याकडे आहेत. लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारती यांचं राम मंदिरासाठी योगदान आहे. शिवसेनेचे सर्व खासदार, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख अयोध्येत उपस्थित होते. देवेंद्र फडणवीसांना ‘डेमोक्रोसी क्लब’ला प्रदर्शनासाठी यावं. फक्त इथे ऑपरेशन कमळ होत नाही, ऑपरेशन बाबरीपण होते.” अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला.