सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अभिमानाचा आणि इतिहासाचा सोनेरी दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा दिवस दरवर्षी मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात साजरा केला जातो. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी मिळावी तसेचं या दिवशी ड्राय डे घोषित करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि शिवप्रेमी प्रविण लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
निवेदनात नेमकं काय म्हणाले लांडगे?
अजित पवार यांना पाठवलेल्या निवेदनात सामाजिक कार्यकर्ते आणि शिवप्रेमी लांडगे म्हणाले, 19 फेब्रुवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत बहुजन प्रतीपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव पूर्ण देशात मोठया आनंदात व उत्सहात साजरा केला जातो. तसेच या दिवशी महाराष्ट्रात मोठया प्रमाणात कार्यक्रम आयोजित केले जातात. त्या उत्सवासाठी रात्री नियमानुसार 10 वाजता सर्व कार्यक्रम बंद केले जातात व त्यामूळे तो वेळ अपुरा असून, 19 फेब्रुवारीच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत कार्यक्रम साजरे करण्यास महाराष्ट्रभर परवानगी मिळवी. सर्व शिवप्रेमी जनतेच्या वतीने आम्ही आपणास विनंती करीत आहोत. जसे आपण गणेशउत्सव, नवरात्र, दहीहंडीला 12 वाजे पर्यंत परवानगी दिलीत त्याचप्रमाणे 19 फेब्रुवारीच्या कार्यक्रमास देखील परवानगी मिळावी ही नम्रविनंती. तसेच 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे पवित्र लक्षात घेऊन त्या दिवशी ड्राय डे घोषित करावा, ही नम्रविनंती. आपण या सर्व गोष्टीचा विचार करून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन महाराष्ट्रातील जनतेच्या आनंदात भर घालावी, ही नम्र विनंती. त्या संदर्भात एक पत्रक काढावे ही विनंती.
19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच, हिंदूंचेच नव्हे तर सर्व भारतीयांचे जगभरातील सर्व लोकांचे प्रेरणास्थान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी १९ फेब्रुवारीला साजरी केली जाते. शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यातील एका मराठा कुटुंबात झाला. तो भारताचा असा शूर सुपुत्र आहे, ज्याच्या शौर्याची कहाणी इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी नोंदवली गेली आहे. कोणत्याही मराठ्याच्या जिभेवर शिवाजी महाराजांचे नाव आले की त्याची छाती अभिमानाने फुलून येते. त्यांनी देशाला मुघलांच्या तावडीतून मुक्त केले आणि मराठा साम्राज्याचा पाया घातला. तथापि, त्यांच्या शौर्याचे उदाहरण केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात दिले जाते.