सोलापूर महापालिकेच्या डिजिटल क्रांतीला वेग, आयटी तज्ज्ञांशी विनामूल्य करार
सोलापूर, शहर प्रतिनिधी: सोलापूर महानगरपालिकेच्या डिजिटल परिवर्तनाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांशी विनामूल्य तांत्रिक सहकार्याचा करार करण्यात आला आहे. या करारामुळे महापालिकेच्या विविध डिजिटल प्रकल्पांना गती मिळणार असून नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि दर्जेदार सेवा उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे अत्याधुनिक एआय (AI) आधारित प्रणाली विनामूल्य उपलब्ध झाल्याने महापालिकेची सुमारे 6 कोटी रुपयांची बचत होणार आहे.
महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या बैठकीत हा करार करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त सोनाली यादव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ॲप रिलाय टेक्नॉलॉजी (Apprely) कंपनीचे संचालक साकेत मोकाटे व प्रसाद कंदलगांवकर यांच्यासह आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांनी महापालिकेच्या डिजिटल उन्नतीसाठी सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली.
या कराराअंतर्गत विद्यमान सॉफ्टवेअर प्रणालींचे आधुनिकीकरण, क्लाऊड कॉम्प्युटिंग, ईआरपी, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, डेटाबेस सुरक्षा, प्रकल्प व्यवस्थापन, सिस्टीम इंटिग्रेशन आणि कर्मचाऱ्यांचे तांत्रिक प्रशिक्षण यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच अॅजाईल आणि स्क्रम पद्धतींचा वापर करून प्रकल्पांची वेळेत व गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी केली जाणार आहे.
महापालिकेत येत्या दीड वर्षात टप्प्याटप्प्याने एआय आधारित प्रणाली कार्यान्वित केली जाणार असून तक्रार निवारण व्यवस्थेपासून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण, कागदविरहित (पेपरलेस) कामकाज आणि प्रशासनातील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.
याबाबत बोलताना महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, “डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांना अधिक दर्जेदार व पारदर्शक सेवा देण्याच्या दृष्टीने हा करार मैलाचा दगड ठरेल. तर आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी या सहकार्यामुळे महापालिकेच्या डिजिटल प्रकल्पांना नवी गती मिळेल.”
ग्रामीण जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा पुरवा; जिल्हा परिषद सदस्या कविता ओबळे यांचे आवाहन






