मंगळवेढा: मंगळवेढा प्रांत कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना व पाणी संघर्ष समिती यांच्यावतीने पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांंना २५ टक्के अग्रीम रक्कम मिळावी. कर्जाची वसूली थांबवावी. ई पीक नोंद पुर्वी प्रमाणे तलाठ्याने करावी या व अन्य मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले असून मागण्या पुर्ण झाल्याशिवाय उठणार नसल्याच्या मुद्यावर आंदोलक ठाम असल्याचे सांगण्यात आले.
मंगळवेढा तालुक्यात यंदा जून पासून पावसाची नक्षत्रे कोरडी गेल्याने खरीप हंगाम धोक्यात सापडला असून पावसाअभावी पेरलेली पिके करपून जात असल्याचे चित्र आहे. या पिकासाठी १ रुपया पीक विमा ६८ हजार शेतकऱ्यांंनी भरला असून दुष्काळी परिस्थितीमुळे २५ टक्के अग्रीम रक्कम त्यांना शासनाने देवून दिलासा द्यावा. तसेच शेतकर्याकडील सर्व कर्जाची वसूली थांबविण्यात यावी. खरीप पिकाच्या कर्जाचे पुनर्गठन करुन रब्बी हंगामासाठी नव्याने पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे. म्हैसाळ योजनेचे पाणी लाभ क्षेत्रातीळ गावांना तात्काळ मिळावे.
–तालुक्यात चाऱ्याची भिषण टंचाई
तसेच मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मान्यतेसह निधी उपलब्ध करुन द्यावा,उजनी उजव्या कालव्याचे पाणी तालुक्यातील लाभ क्षेत्राला मिळावे त्याच बरोबर हे पाणी माण नदीत सोडून नदीकाठावरील शेतीला दिलासा द्यावा. पावसाअभावी तालुक्यात चाऱ्याची भिषण टंचाई निर्माण झाली असून चारा डेपो सुरु करुन शेतकऱ्यांचे पशुधन वाचवावे. १५ जून पासून बंद असलेले पी एम किसान योजनेचे काम तात्काळ सुरु करावी तसेच शेतकऱ्यांंना चूक दुरुस्तीसाठी एक खिडकी योजना चालू करावी. दूधाला विनाकपात ३४ रुपये पेक्षा कमी दर देणार्या संस्थेवर कायदेशीर कारवाई करावी. शेतकरी वर्ग हा अज्ञान असल्यामुळे त्यांना मोबाईल मधील पुरेसे ज्ञान नाही. परिणामी मोबाईलवर ई पीक पाहणी नोंद करताना अनेक अडचणींना सामना करावा लागता असल्यामुळे बरेसचसे ग्रामीण शेतकरी या पीक नोंदीपासून वंचित रहात असल्यामुळे त्यांना शासनाचा लाभ मिळणे दुरापास्त बनत आहे.
– मनरेगातून कामे उपलब्ध करुन द्यावे
दरम्यान पुर्वी प्रमाणे गावकामगार तलाठ्यांनी शेताच्या बांधावर जावून पिकाच्या नोंदी करुन घ्याव्यात. सर्व प्रकारच्या पशु खाद्याचे दर नियंत्रीत करावेत. लम्पी आजाराने मेलेल्या जनावरांचे अनुदान शेतकर्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावे, दुष्काळाची छाया गडद होत असल्याने मजूरांच्या हाताला कामे नसल्याने मनरेगातून कामे उपलब्ध करुन द्यावे, अशा विविध मागण्यासाठी हे धरणे आंदोलन (दि.४) पासून सुरु आहे.
हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष अॅड. राहुल घुले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवराज घुले, श्रीमंत केदार, आबा खांडेकर, हरी खांडेकर, श्रीशैल्य हत्ताळी, बाळासो खताळ, भोजलींग जानकर, विराज कदम,नागेश बिराजदार, दत्तात्रय म्हेत्रे, संभाजी मलमे, बंडू थोरबोले,संजय चौगुले,रावसाहेब संपांगे, हरी जानकर आदी या बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी झालेले आहेत.
सध्या पाऊस नसल्यामुळे तालुक्यावर दुष्काळाची गडद छाया असताना वीज वितरण कंपनीने शेतकर्यांना कृषी पंपाची प्रिंट वीज बिले भरण्याचा तसेच मोबाईलवरुन कायदा कलम टाकून कारवाईचा मेसेज पाठवून ऐन दुष्काळात जखमेवर मिठ चोळण्याचे काम केल्याने वीज वितरण कंपनीच्या कारभाराचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.