संग्रहित फोटो
पुणे : अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, तर त्यांनी चक्क औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती, असं ते एका पॉडकास्ट मुलाखतीत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विविध स्तरांतून निषेध व्यक्त झाला. अनेक राजकीय नेत्यांनी त्यावरून तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातचं आता खासदार सुनिल तटकरे यांनीही संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत खोटा इतिहास सांगणारा राहूल सोलपूरकर म्हणजे एक विकृत प्रवृत्ती असून त्याने राजद्रोहा सारखा गुन्हा केला आहे. अशी विकृत प्रवृत्ती ठेचायलाच हवी. सरकारने कायद्याने ती ठेचावी. समाज आपल्या पध्दतीने निर्णय घईल, अशी कठोर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेल व सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश कार्यकारिणीची पुणे येथील हाॅटेल सेंट्रल पार्कमध्ये स्वतंत्रपणे बैठक पार पडली. यावेळी खासदार तटकरे यांनी पक्षाच्या पदाधिकार्यांसमोर ही भूमिका मांडली. मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगड लोकसभेचे नेतृत्व करतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलची कोणत्याही विखारी विकृतीचे कधीच समर्थन होवू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार घेवून चालणारा पक्ष आहे. महापुरूषांचा आदर आणि सन्मान हा आपल्या पक्षाचा मंत्र आहे. त्यामुळे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तो सन्मान सर्वोच्च स्थानी ठेवून महापुरूषांचे विचार घेवूनच समाजात वागावे. असेही खासदार तटकरे म्हणाले. आगामी काळात पक्षात शिस्तीला महत्व दिले जाणार आहे. रायगडचे ओबीसी सेलचे अध्यक्ष बैठकीला उपस्थित राहिले नसल्याने त्यांचे तडकाफडकी निलंबन करत असल्याची घोषणाही खासदार तटकरे यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सोलापूरकर काय म्हणाले होते?
“छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटारे-बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन महाराज आले आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्या आहेत, याचेसुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलासुद्धा महाराजांनी लाच दिलेली आहे. मोहसिन खान का मोईन खान नाव आहे बहुतेक त्याचं.. त्याच्याकडून अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत. स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची अजूनही खूण सुद्धा आहे. लोकांना गोष्टी रुपात सांगताना काहीतरी रंजक करून सांगावं लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो किंवा बाजूला टाकला जातो,” असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते.