मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हत्येप्रकरणी विशेष सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यामध्ये सुरज पांचोलीने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. पांचोलीने जियाची आई राबियाने केलेल्या आरोपांचे खंडन केले असून त्यास विरोध केला आहे.
२०१३ मध्ये अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली होती. त्यानंतर केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) ने जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत जियाचा कथित प्रियकर म्हणून अभिनेता सुरज पांचोलीला अटक केली. सध्या सुरज जामीनावर आहे. विशेष एसआयटीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी जियाच्या आईच्यावतीने करण्यात आली आहे. या प्रकरणी विशेष न्यायालयात विशेष न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्यासमोर या प्रकरणात जियाची आई राबियाची साक्ष नोंदवण्यात आली असून त्यावर सुरज पांचोलीच्यावतीने अँड. प्रशांत पाटील यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
न्यायालयाने ३० जानेवारी २०२० रोजी पांचोलीविरोधात आरोप निश्चित करण्यात आले. आतापर्यंत फक्त १६ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. राबियांचा जबाब संपला असून त्याची उलटतपासणी सुरू आहे. अशावेळी जर राबिया यांच्या याचिकेला परवानगी दिल्यास आपल्यावर अन्याय होईल, अशी निराधार याचिका दाखल करून खटला लांबविण्याचा राबियांचा मानस असल्याचा दावाही प्रतिज्ञापत्रात केला आहे. २०१६ मध्येही जियाने अशीच मागणी केली होती त्याला सीबीआयने विरोध केला होता.
सध्या या प्रकरणावर तपास सुरू आहे, यासंदर्भात उत्तर दाखल करण्यासाठी वाढीव वेळ द्यावा, अशी मागणी सीबीआयच्यावतीने अँड. संदेश पाटील यांनी न्यायालयाकडे केली. त्याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.