डोबिंवलीत दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत झालेला वादाचा रागातून माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि मेघराज तुपांगे यांच्या समर्थकांमध्ये राडा झाल्याची माहित आहे. या राड्यात पाच जण जखमी आहेत. तर विष्णू नगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. विष्णूनगर पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील राजुनगर खंडोबा मंदिराजवळ व्यावसायिक मिलिंद देशमुख यांचे कार्यालय आहे. या कार्यालयात विकास म्हात्रे काही कामानिमित्त शनिवारी रात्री गेले होते. याचदरम्यान मेघराज तुपांगे देखील त्याठिकाणी आले. मेघराज तुपांगे यांचा म्हात्रे यांच्या पोलिस अंगरक्षकासोबत वाद झाला. मेघराज तुपांगे यांचा आरोप आहे की, त्याठिकाणी मला धमकी देण्यात आली. मी कार्यालयाबाहेर पडलो त्यादरम्यान विकास म्हात्रे यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आणि माझा मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आले. तलवार, रॉड आणि लाकडी दांडके घेऊन दहा ते पंधरा जणांनी माझ्यासह माझ्या मित्रांवर प्राणघातक हल्ला केला. यावेळी, माझी चैनदेखील चोरण्यात आली. निवडणुकीचा राग माझ्यावर काढण्यात आला. माझी काही चुकी नसताना हा हल्ला केला आहे. त्यांच्यामुळे माझ्या जीविताला धोका आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे पोलिसांकडून मला. न्याय मिळेल अशी मला आशा असल्याचे तुपांगे यांनी सांगितले.
याबाबत विकास म्हात्रे म्हणाले की, देशमुख यांच्या कार्यालयात गेलो असता, माझ्या पोलिस अंगरक्षकाला तुपांगे यांनी शिवीगाळ केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर, अंगरक्षकासोबत स्थानिक पोलीस ठाण्यात जावून तक्रार दाखल केली. त्यानंतर, सुमारे अर्ध्या तासानंतर तुपांगे यांनी त्यांच्या समर्थकासह आमच्यावर हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटाच्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे. मेघराज तुपांगे यांच्या तक्रारीवरून ओमकार म्हात्रे, प्रमोद चव्हाण, महेश चव्हाण, अजय गोलतकर आणि अखिल निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात मेघराज तुपांगे, विशाल म्हात्रे आणि शत्रुघ्न मढवी हे तिघे जखमी आहेत. तर, अजय गोलतकर यांच्या तक्रारीवरून मेघराज तुपांगे, उमेश भोईर, शत्रुघ्न मढवी, विशाल म्हात्रे, अशोक म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन जण जखमी आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही गटातील चार जनांना अटक केली आहे.