दरम्यान, शिवसेनेच्या युवासेनेचे पदाधिकारी गुरु ज्योतसिंग यांनी समाजमाध्यमावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करत आमदार मेहता यांच्यावर टीका केली. या व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह भाषा व शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करत भाजप नगरसेवकांनी संबंधित पदाधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याशिवाय, समाजमाध्यमांवर बनावट फोटो आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी पोलिसांकडे केली आहे.
दरम्यान, नगरसेवकांचे निवेदन नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी स्वीकारले असून, या प्रकरणाचा सखोल तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.या संपूर्ण प्रकारामुळे मिरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत असून, आगामी काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नरेंद्र मेहता यांनी एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत असं म्हणाले होते की, “प्रताप सरनाईक मेरे ड्रायव्हर होते”. या वक्तव्यामुळे सरनाईक विरुद्ध मेहता हा वाद चांगलाच चिघळला आहे. यासगळ्याने सरनाईक यांचे सुपुत्र पुर्वेश सरनाईक यांनी नरेंद्र मेहता यांना निवेदन देत सणसणीत टीका केली. नरेंद्र मेहता यांना दिलेल्या निवेदनात पुर्वेश सरनाईक म्हणाले की, सर्वप्रथम, मीरा भाईंदर महानगरपालिकेतील आपल्या भव्य विजयाबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. जनतेने दिलेला हा कौल आम्ही पूर्णपणे मान्य करतो आणि त्याचा आदरही करतो. लोकशाहीत जनतेचा निर्णय अंतिम असतो हे आम्हालाही तेवढ्याच प्रामाणिकपणे पटते. मात्र, या विजयानंतर आपण आता शहराच्या विकासावर, जनतेच्या प्रश्नांवर आणि ठोस कामांवर लक्ष केंद्रित कराल, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. परंतु, दुर्दैवाने गेल्या काही दिवसांत आपल्या वक्तव्यांमध्ये केवळ प्रताप सरनाईक यांच्यावर टीका करण्याचीच घाई दिसून येत आहे. जे स्वतः चार वेळा जनतेने निवडून दिलेले आमदार आणि आज राज्याचे मंत्री आहेत.
आपले अलीकडील वक्तव्य “प्रताप सरनाईक मेरे ड्राइवर होते” हे ऐकून खरोखरच आश्चर्य वाटले नाही. कारण ते आपल्या राजकीय संस्कारांचेच प्रतिबिंब होते. मात्र, त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वातील खालच्या पातळीचा अंदाज नक्कीच आला. मेहताजी, राजकारणात मतभेद असू शकतात, विचार वेगळे असू शकतात पण त्यात एक सभ्यता आणि मर्यादा असते. ती राखणे ही प्रत्येक जनप्रतिनिधीची जबाबदारी असते.राजकारणात मोठेपणा शब्दांनी नव्हे, तर वर्तनाने सिद्ध करावा लागतो. माझ्या आई-वडिलांनी मला एक गोष्ट शिकवली आहे.विचार जुळत नसले तरी व्यक्तीचा आदर ठेवावा आणि तेच मी आजपर्यंत पाळत आलो आहे, अशा तीव्र शब्दात पुर्वेश यांनी मेहता यांचा निषेध केला.






