मुंबईचे प्रवेशद्वार हिरवळीने फुलणार! वाशी, ऐरोली नाक्यावर होणार हरित विकास; महापौर रितू तावडेंकडून स्थळपाहणी
मुंबई महानगराचे मुख्य प्रवेशमार्ग असलेल्या वाशी नाका आणि ऐरोली नाका परिसराचा पर्यावरणीय आणि सौंदर्यात्मक दृष्टिकोनातून कायापालट होणार आहे. या दोन्ही महत्त्वाच्या प्रवेशद्वारांवर पर्यावरणपूरक आणि आकर्षक असा हरितक्षेत्र विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी सोमवार १ जून रोजी वाशी आणि ऐरोली नाका परिसराची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी महामार्गाच्या दुतर्फा नियोजनबद्ध वृक्षारोपण करून हरित क्षेत्र विकसित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आगामी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, ५ जून रोजी या भव्य उपक्रमाचा प्रातिनिधिक शुभारंभ महापौरांच्या हस्ते रोपांची लागवड करून केला जाणार आहे.(फोटो सौजन्य – AI)
महापौर रितू तावडे म्हणाल्या की, ‘वाशी आणि ऐरोली नाक्यावरून दररोज हजारो वाहनांची आणि नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे या परिसराचे सुशोभीकरण आणि पर्यावरणीय समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पांतर्गत महामार्गालगत वाढलेली अनावश्यक झुडपे, तण आणि इतर वनस्पती काढून संपूर्ण परिसर स्वच्छ केला जाईल. हरित पट्टा अधिक आकर्षक आणि नयनरम्य करण्यासाठी वृक्षारोपणात रंगीबेरंगी फुलझाडांना प्राधान्य दिले जाणार आहे. प्रामुख्याने ‘पिक टेब्यूबिया’ आणि ‘पिवळा बहावा’ यांसारख्या देखण्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाईल. या घनदाट हिरवाईमुळे परिसरातील धूळ आणि वाहनांमधून होणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल, तसेच हवेची गुणवत्ता सुधारून स्थानिक नागरिकांना स्वच्छ व निरोगी वातावरण लाभेल.
या सुशोभीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून पूर्व द्रुतगती महामार्गावर विशेष लागवड केली जाणार आहे. पंतनगर ते मुलुंड या दरम्यान असलेल्या खाडीकिनारच्या मोकळ्या जागांवर महापालिकेच्या एन, एस, आणि टी या तिन्ही प्रशासकीय विभागांच्या हद्दीत ‘पिवळ्या बहाव्याची’ विशेष लागवड करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत.
खाडीच्या कडेला बहरणारा हा पट्टा मुंबईच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच कार्बन शोषणास चालना देईल आणि पक्षी व इतर जीवांसाठी उत्तम अधिवास निर्माण करेल. या पाहणी दौऱ्यात प्रभाग समिती अध्यक्ष खैरनुसा हुसेन, उपायुक्त संध्या नांदेडकर, संतोषकुमार धोंडे, विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, टी विभागाच्या सहायक आयुक्त योगिता कोल्हे आणि उद्यान, पूल व वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रात्रीच्या वीज कपातीने नवी मुंबईकर हैराण! वाढत्या उष्णतेत झोपमोड, संताप आणि प्रशासनाविरोधात नाराजी
हा उपक्रम केवळ पालिकेपुरता मर्यादित न राहता लोकसहभागातून यशस्वी करावा, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले आहे. उपक्रमासाठी शासकीय विभाग, लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्र यावे. ‘हरित मुंबई’च्या संकल्पनेला बळकटी देणारे हे पाऊल भविष्यात मुंबईसाठी एक आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






