महाराष्ट्राची लाडकी 'दख्खनची राणी' ९६ वर्षांची! सीएसएमटी स्थानकात वाढदिवस उत्साहात; पंजाब मेलची ११४ वर्षांची वाटचाल
भारतीय रेल्वेच्या इतिहासातील दोन मानाच्या गाड्यांचा वाढदिवस सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राची लाडकी ‘दख्खनची राणी’ अर्थात डेक्कन क्वीनने ९६ वर्षे पूर्ण करून ९७व्या वर्षात पदार्पण केले, तर देशातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेल्या पंजाब मेलने ११४ वर्षे पूर्ण करून ११५व्या वर्षात प्रवेश केला.यावेळी सीएसएमटी स्थानकात केक कापून दोन्ही गाड्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. रेल्वे कर्मचारी, रेल्वेप्रेमी आणि प्रवाशांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत दोन्ही गाड्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. वेग, विश्वासार्हता आणि समृद्ध परंपरा यांमुळे डेक्कन क्वीन आणि पंजाब मेल या दोन्ही गाड्यांनी भारतीय रेल्वेच्या इतिहासात अढळ स्थान निर्माण केले आहे.(फोटो सौजन्य – AI)
ब्रिटिशकालीन ग्रेट इंडियन पेनिन्सुला (जीआयपी) रेल्वेने १ जून १९३० रोजी मुंबई-पुणे मार्गावर डेक्कन क्वीनची सेवा सुरू केली. त्या काळात ही देशातील सर्वात आधुनिक आणि वेगवान प्रवासी गाड्यांपैकी एक मानली जात होती. भारतीय रेल्वेच्या पहिल्या सुपरफास्ट गाड्यांमध्ये तिचा समावेश होतो. मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी ही गाडी आजही प्रवाशांची पहिली पसंती मानली जाते.
डेक्कन क्वीनच्या ९६ वर्षांच्या प्रवासात अनेक बदल घडले आहेत. सुरुवातीच्या काळातील पारंपरिक डब्यांपासून आधुनिक एलएचबी कोचपर्यंतचा प्रवास तिने अनुभवला आहे.एकेकाळी निळ्या-चंदेरी रंगसंगतीमुळे ओळखली जाणारी ही गाडी आता अत्याधुनिक सुविधांनी सज्ज झाली आहे. तिची ओळख बनलेली ‘डायनिंग कार’ अर्थात धावते उपाहारगृह आजही कायम असून प्रवाशांसाठी ती विशेष आकर्षणाचा विषय आहे.याशिवाय सह्याद्रीच्या निसर्गरम्य घाटांचे विहंगम दर्शन घडविणारा व्हिस्टाडोम कोचही या गाडीचे आणखी एक वैशिष्ट्य ठरला आहे.
रात्रीच्या वीज कपातीने नवी मुंबईकर हैराण! वाढत्या उष्णतेत झोपमोड, संताप आणि प्रशासनाविरोधात नाराजी
मुंबई-पुणे मार्गावरील खंडाळा घाटातून धावणाऱ्या या गाडीने अनेक पिढ्यांचा प्रवास अनुभवला आहे.कार्यालयीन प्रवासी, व्यावसायिक, विद्यार्थी आणि पर्यटक यांच्यात आजही तिचे वेगळे स्थान आहे.१ जून १९१२ रोजी सुरू झालेल्या पंजाब मेलनेही ११४ वर्षांचा गौरवशाली टप्पा पूर्ण केला. स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबई आणि उत्तर भारताला जोडणारी ही गाडी देशातील सर्वात महत्त्वाच्या रेल्वे सेवांपैकी एक होती. काळाच्या ओघात अनेक बदल अनुभवत पंजाब मेल आजही लाखो प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहे. भारतीय रेल्वेच्या समृद्ध वारशाचे प्रतीक म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.






