मुंबई : विरोधी पक्षनेते पदाबाबत काँग्रेस, शिवसेना आणि आमची चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP MLA) आमदारांची संख्या कमी असेल, तर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी काँग्रेसकडे जाईल. अधिवेशन चालू झाल्यावर विरोधी पक्षनेते पदावर निर्णय होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे.
विरोधी पक्षनेते पदाबाबत अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांची काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा होणार आहे. विरोधी पक्षनेते पदाबाबत योग्य निर्णय होईल, असेही ते म्हणाले. काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला असून, त्याला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून सहमती दर्शवली आहे. काँग्रेसमधील दुसऱ्या फळीतील नेत्याकडे ही जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी चार नावांची जोरदार चर्चा आहे.
या नावांची सर्वाधिक चर्चा
काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदाबाबत दावा केल्यास या पदासाठी सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदी राहणार आहे. बाळासाहेब थोरात काँग्रेस गटनेते राहणार असून, त्यात बदल होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
विरोधी पक्षांशी चर्चा विचारविनिमय करणार
आमदारांची संख्या पाहिली तर विरोधी पक्षनेते पदावर दावा करणे योग्य नाही. ज्या पक्षाकडे जास्त आमदार आहेत, त्यांच्या पाठिंब्याशिवाय विरोधी पक्षनेता काम कसे करणार? आमच्यातून बाहेर गेलेले लोक फुटले आहेत, असे सांगत नाहीत. विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे. कागदावर आमचा पक्ष सर्वात मोठा आहे. पण आमच्यातील 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांशी चर्चा विचारविनिमय करावा लागेल.
– जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस