संग्रहित फोटो
महाबळेश्वर : महाबळेश्वर शहर व परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नगरपालिकेने प्रमुख चौकात सिग्नल यंत्रणा सुरू केली होती, परंतु ही यंत्रणा गेली अनेक काही वर्षे बंद पडली आहे. नगरपालिकेच्या संबंधित विभागाचे या यंत्रणेकडे दुर्लक्ष होत आहे. मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी बंद पडलेले सिग्नल यंत्रणा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण प्रसिध्द आहे. येथे दरवर्षी साधारण १८ ते २० लाख पर्यटक भेट देऊन महाबळेश्वरच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटतात. पूर्वी हंगामात येथे गर्दी होत असे परंतु आता बाराही महिने महाबळेश्वरला पर्यटकांची वर्दळ असते. विकेंड व सलग सुट्ट्यांत महाबळेश्वर येथे पर्यटकांच्या गर्दीत वाढ होते. या गर्दीमुळे महाबळेश्वर येथे वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडी होेते. महाबळेश्वर शहराकडे येणारे रस्ते हे अरूंद असल्याने पर्यटकांचा बराचसा वेळ या कोंडीत जातो.
काही महिन्यातच यंत्रणेत बिघाड
शहरातील बहुतांशी रस्त्यांवर कोंडी होते. विशेषत: चौकात अधिक कोंडी होते. ही कोंड सोडविण्यासाठी नगरपालिकेने शहरातील काही प्रमुख चौका चौकात सिग्नल यंत्रणा बसविली होती. वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांना वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या सिग्नलचा चांगला उपयोग होत होता. नगरपालिकेने राबविलेल्या या सिग्नल यंत्रणेचे शहरातून चांगले कौतुक झाले होते. ही यंत्रणा सुरू झाली पंरतु काही महिन्यातच यंत्रणेतील बिघाडामुळे कुचकामी ठरली. ही यंत्रणा पुन्हा सुरू करण्याचे कष्ट नगरपालिकेने घेतले नाही. त्यामुळे चौकाचौकात बसविलेले सिग्नल हे शो पीस ठरले आहेत.
हे सुद्धा वाचा : आईने प्रियकरासोबत रचला मुलाच्या हत्येचा कट, आरोपी अटकेत; नेमकं काय घडलं?
प्रशासक लक्ष देणार का?
नगरपालिकेचे विद्यमान प्रशासक नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी आग्रही असतात. त्यांनी आपल्या कार्यकाळात शहरासाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. वेण्णालेक येथे विद्युत रोषणाईसह कृत्रिम वृक्ष, डिजिटल डिसप्ले, माझी वसुंधरा अभियानातील पाच तत्वांच्या प्रतिकृती असे अनेक उपक्रम राबविले आहेत. भविष्यात देखिल काही उपक्रम राबविणार असल्याचे ते नेहमी सांगतात, परंतु सिग्नल यंत्रणेकडे त्यांचे लक्ष कसे गेले नाही, या बाबत शहरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगरपालिका प्रशासन बंद पडलेली सिग्नल यंत्रणा सुरू करणार का याकडे शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
हे सुद्धा वाचा : चांदीच्या अंगठ्यांना सोन्याचा मुलामा, सोनाराची लाखाची फसवणूक; 4 जणांना बेड्या