कुर्डुवाडी : हा मेळावा हा सरकारविरोधी आहे असं नाही. आपण महायुतीचंच काम करणार आहोत. पण हे काम करत असताना ज्या खासदारानं सर्वसामान्यांना कधी गृहीतच धरलं नाही, असा उमेदवार आहे म्हणून हा आजचा मेळावा आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही निर्णय बदलून वेगळा उमेदवार द्या, अशी मागणी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी केली. कुर्डुवाडी येथे आयाेजीत माढा लोकसभा मतदार संघातील संवाद व निर्धार मेळाव्यात ते बाेलत हाेते.
प्रा. सावंत म्हणाले, जो खासदार आपल्या जिल्ह्यातला नसताना, लोकलचा नसताना त्यांना पूर्ण ताकदीनीशी निवडून दिलं. त्या खासदारांच पाच वर्षात काम काय? आपण ग्रामपंचायत, सोसायटी सारख्या सगळ्या निवडणूका राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो. आज महायुतीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे माढाचे आमदार आणि करमाळ्याचे आमदार इकडे आले. आणि आपलं खासदार अलगद त्यांच्यामध्ये जाऊन बसले. त्यांनी सांगितलं दोन लाखांनी निवडून आणू म्हणून त्यांना कुणाची आवश्यकता वाटली नाही. त्यांनी आपल्याला भेटण्याचा कधी प्रयत्न केला नाही.
त्यांना अजूनही लक्षात आलं नाही की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ज्यांनी आपल्याला मतं दिली. आपल्याला निवडून दिलं. त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी संवाद साधणं हे त्यांच काम आहे. मतदार संघातील जे महत्वाचे प्रश्न आहेत रेल्वे कारखाना, रेल्वे गेटवरील उड्डाणपूल, माढ्यातील रेल्वे गेटवरील उड्डाणपूल यासाठी त्यांनी निधी उपलब्ध करुन द्यायला पाहिजे होता. रेल्वे मंडळावर ते सभासदही होते. पण तेही काम झालं नाही.
सर्वसामान्य माणूस जागा
खासदारकीची निवडणूक सुद्धा ग्रामपंचायतीसारखी झाली आहे. सर्वसामान्य माणूस जागा झाला आहे. त्याला कळतं कोण काम करतं कोण नाही. माणूस तसा चांगला असला पाहिजे काम करणारा असला पाहिजे. नसेल तर जो कोणी उमेदवार देतील त्याला बांधून घेतलं पाहिजे. आदेश वरुन येतो हे मान्य आहे. पण वरच्या सुद्धा नेत्याला माझी विनंती आहे. आपण दिलेला उमेदवार सर्वसामान्यांपर्यंत पोहचतोय का, त्यांच काम करतो का हेही बघणे त्यांच काम आहे.