झेडपीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून उमेदवारी अर्ज नेणाऱ्यांची संख्या 2 हजार 966 घरात पोहोचली आहे. अनेकांनी ‘सावध पाऊल’ म्हणून अर्ज घेतले आहेत. मात्र प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याची वेळ आली की, युती-अघाडीचा तिढा, पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल की नाही, अपक्ष लढायचे की नाही, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे अनेक इच्छुक ‘थांबा आणि पाहा’ या भूमिकेत आहेत.
ग्रामीण भागात सध्या राजकीय बैठकांचा सपाटा सुरू आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चहाच्या टपऱ्या, ग्रामपंचायत कार्यालये, कार्यकर्त्यांची घरे या ठिकाणी चर्चा रंगत आहेत.‘आपला नंबर लागेल का’,‘पक्ष तिकीट देईल का,‘युती झाली तर काय,’ असे प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी आहेत.
गेल्या निवडणुकांचा अनुभव पाहता, शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांचे जथ्थे, समर्थकांची गर्दी, घोषणाबाजी, रॅलीसारखे वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. युती-अघाडीची घ ोषणा होते की नाही, किती जण अर्ज दाखल करतात, अपक्षांची संख्या किती वाढते, यावर पुढील राजकीय गणित अवलंबून राहणार आहे. उद्याच्या गर्दीवरूनच या निवडणुकीची खरी झलक दिसणार आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय जिल्हा परिषद आणि ( पंचायत समिती) साठी दाखल झालेलेल्या अर्जांची संख्या अशी ः आटपाडी 20 (15), जत 35 (48), खानापूर 5 (5), कडेगाव 4 (13), तासगाव 30 (39), कवठेमहांकाळ 13 (26 ), पलूस 8 (4), वाळवा 13 (25), शिराळा 17 (27 ), मिरज 30 (30) एकूण 165 (232) असे एकूण 407 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.






