भाईंदर/ विजय काते : पावसाळा तोंडावर आला तरी नालेसफाई अद्याप पूर्ण झालेली नाही. याचपार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे. काशिमिरामधील साई पॅलेस हॉटेलच्या मागच्या बाजूने वाहणाऱ्या मोठ्या नाल्यामुळे परिसरातील आदिवासी वस्तीला दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या नाल्याची दुरवस्था आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीच्या तक्रारी वारंवार दिल्या जात असतानाही महानगरपालिकेकडून कोणतीच ठोस कारवाई न झाल्याने आज मीरा-भाईंदरचे आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी दौरा केला आहे.
परिसरातील नाला डोंगरातून वाहत येत आदिवासी पाड्याच्या शेजारून जात असल्याने जून-जुलैमध्ये पावसाचे प्रमाण वाढले की, मोठ्या प्रमाणात पाणी घरात शिरते. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होते. अनेक वेळा तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष झाल्याने स्थानिक संतप्त होते.उल्लेखित नाला पश्चिम दिशेला महामार्गालगत स्थित आहे. सद्यस्थितीत या नाल्याच्या किनारी कोणतीही संरक्षण भिंत (प्रोटेक्शन वॉल) बांधलेली नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत हा नाला पाण्याने पूर्णतः भरून वाहतो. या ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामुळे महामार्गावरील वाहतुकीस गंभीर धोका निर्माण होतो. विशेषतः भर पावसात नाल्यातील पाणी महामार्गावर येते, ज्यामुळे गाड्यांचे नियंत्रण सुटण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे अपघात होऊ शकतो.
आजच्या पाहणी दौऱ्यात महानगरपालिकेचे आयुक्त, वरिष्ठ अधिकारी व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रताप सरनाईक यांनी नाल्याची पाहणी करून तात्काळ रुंदीकरणाचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “या नाल्यामुळे आदिवासी वस्तीला कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून तातडीने काम हाती घेण्यात यावे.”अशा सूचना देण्यात आल्या .तसे पश्चिम तिथे महामार्गाच्या बाजूला असलेला हा नाला त्याच्या बाजूला संरक्षण भिंत नसल्याने पावसामध्ये हा नाला पाण्याने तुटुंब भरून वाहत असतो. त्यामुळे बाजूला महामार्गावर असणाऱ्या गाड्यांना अपघात होऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे.