मंचर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हुतात्मा बाबू गेनू यांच्या महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील जन्मघरी भारतीय सैन्य दलातील जवान राहुल सैद याच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव राज्यात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान साजऱ्या होणाऱ्या घरोघरी तिरंगा या अभियानात सर्व नागरिकांनी सामील व्हावे, असे आवाहन हुतात्मा बाबू गेनू सैद यांचे पुतणे किसनराव सैद यांनी केले. तिरंग्याच्या सन्मानार्थ हाती घेण्यात आलेलं ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करणं ही भारतीय म्हणून आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक घरी तिरंगा फडकावू या, भारतमातेला एकदिलाने अभिवादन करू या, असे बाबाजी चासकर यांनी सांगितले. यावेळी हुतात्मा बाबू गेनू यांचे पुतणे मारुती सैद, किसनराव सैद, रामचंद्र चासकर गुरुजी, बाळासाहेब सैद, संदीप पडवळ, किशोर भालेराव आणि हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठान, व हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठान चे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.






