ठाकरे गट-मनसे युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले, आता कोणतीही...
“२० वर्षांनंतर एका व्यासपीठावर आम्ही एकत्र आलो. पहिल्यांदा आम्ही मराठीच्या विषयावर एकत्र आलो. ते मी आधीच सांगितलं की आम्ही एकत्र आलोय तर ते एकत्र राहण्यासाठीच. मराठीच्या विषयावर आम्ही एकत्रच राहणार आहोत. पुढे मुद्दा येतो तो राजकारणाचा. आता कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाही. जेव्हा निवडणूक जाहीर होईल, त्यावेळी आम्ही चर्चा करू,” असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. कारण याच व्यासपीठावर तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले हे दोन्ही नेते पुन्हा राजकारणात एकत्र येणार का? यावर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला जोरदार विरोध झाला. मराठी भाषेच्या अस्मितेच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, मोर्च्याच्या आधीच राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला.
तरीसुद्धा, मराठीच्या हक्कासाठी ठाकरे बंधूंनी विजय मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येत सरकारविरोधात भूमिका घेतली. त्यांच्या या एकत्र येण्याने राज्यात नवे राजकीय समीकरण तयार होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या मंचावरून केवळ हिंदीच्या विरोधातच नव्हे, तर मुंबईच्या भवितव्याविषयीही स्पष्ट भूमिका घेण्यात आली. उद्धव ठाकरे म्हणाले, “मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. पण मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे कोणी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा प्रयत्न करेल, त्यांचे तुकडे करणार हे मी जाहीरपणे सांगतो.”
आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांना कधी होणार शिक्षा? विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं
या संपूर्ण घडामोडींमुळे मराठी अस्मिता, भाषेचा अभिमान आणि मुंबईचं स्थान यावर केंद्रित झालेला हा कार्यक्रम केवळ एक राजकीय सभा न राहता, राज्याच्या भवितव्याशी निगडित महत्त्वपूर्ण वळण घेत आहे. ठाकरे बंधूंचं हे ऐतिहासिक एकत्र येणं राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवू शकतं, अशी शक्यता अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. मात्र राजकीय युती होईल की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे.