सौजन्य - नवराष्ट्र टीम
युवा सेनेच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग माळीनगर (दोन नंबर गट) येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. दीपावलीच्या काळात काही मोजक्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. अद्यापही नुकसानग्रस्त अनेक शेतकरी सरकारी मदतीची वाट पाहात आहेत. येत्या पंधरा दिवसात सर्व शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा निषेध करून त्यांना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
या रास्ता रोकोमध्ये युवा सेना उपतालुका प्रमुख दत्ता साळुंखे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख आशा टोणपे, शहर प्रमुख शेखर खिलारे, गणेश कदम, संजय पोळ, सचिन भोसले, पोपट जमदाडे, धनाजी मस्के, रज्जाक मुलाणी, आप्पा महाडिक, पप्पू पाटील, अशोक चव्हाण, सचिन मिसाळ, ओम पराडे, विकास भोई, प्रशांत पराडे, अक्षय पराडे, दयानंद इंगळे, रोहित इंगळे, किरण पराडे, गणेश काळे, गोरख पराडे, बंशीलाल भोई, शुभम भोई, मुकुंद गायकवाड आदी उपस्थित होते.
राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही
राज्यात महापुराने शेतकऱ्यांची दैना केली असतानाच तसेच मराठवाड्यामध्ये अवघी जमीन खरडून गेली असताना हतबल शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. पण अनेक शेतकऱ्यांना काहीच पैसे मिळाले नाहीत. शेतकऱ्यांचा मदतीसाठी आक्रोश सुरू आहे. केंद्र सरकारनेच दिलेल्या लेखी माहितीमध्ये राज्य सरकारकडून अजूनही मदतीसंदर्भात कोणताच प्रस्ताव गेला नसल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय कृषिमंत्री यांनी संसदेमध्येच ही माहिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीचे काय? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.






