भिवापूर : भरधाव ट्रकने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार काका व पुतण्या गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी भिवापूर बसस्थानक परिसरात झाला. दुष्यंत कृष्णा थाटे (वय 35) व हर्षल प्रभाकर थाटे (वय 15, दोन्ही रा. मेंढा) असे जखमी काका व पुतण्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी दुष्यंत व पुतण्या हर्षल हे भिवापूर बसस्थानक संकुलासमोरील ब्रेकफास्ट हब येथे नाश्ता करुन आपल्या दुचाकीने मेंढा गावाकडे जात होते. नागपूरकडून आलेल्या दुचाकीने काका दुश्यंत यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात काका पुतणे दुचाकीवरुन खाली पडले असता मागून आलेल्या ट्रकच्या चाकात सापडले. या अपघातात काका व पुतण्याला गंभीर दुखापत झाली.
घटनास्थळावरील नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना प्रथम भिवापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. येथील डॉक्टरांनी जखमींना तपासून व प्राथमिक उपचार देत पुढील उपचारार्थ नागपूर मेडिकल रुग्णालयाकडे रेफर केले. दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी भिवापूर पोलिसांनी घटनेची नोंद केली, पुढील तपास सुरु आहे.
ट्रॅफिक पोलिस कुठे होते?
भिवापूर बसस्थानक संकुलासमोर वाहतूक सुरळीत राखण्याच्या उद्देशाने येथे ट्रॅफिक पोलिस तैनात करण्यात आला. मात्र, बुधवारी घडलेल्या घटनेवेळी येथे तैनात ट्रॅफिक पोलिस एका दुकानात आराम फरमावत होता. अशी बसस्थानक संकुल परिसरातील दुकानदार व प्रत्यक्षदर्शी नागरिकांमध्ये चर्चा होती.