मान्सूनपूर्व पावसाने उडवली कराडकरांची दैना; शेतकऱ्यांचे हाल; शहरी वाहतूक विस्कळीत
कराड : कराड शहर व तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. समुद्रात वादळी वाऱ्यांची निर्मिती झाल्याने झाल्याने कोसळणाऱ्या या पावसाने नागरिक, शेतकऱ्यांची पुरती दैना उडवली आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून कराड शहर आणि तालुक्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. तर उर्वरित भागात पावसाची सलग संततधार सुरू आहे. यामुळे कराड शहर परिसरात वारंवार वाहतूक विस्कळीत होत असून, नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अशातच पुणे-बंगळुरु महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून, या कामासाठी महामार्गाच्या सेवा रस्त्यांवर अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यायी रस्ते बंद झाल्याने नांदलापूर ते वारुंजी फाटा यादरम्यान मोठे वाहतूक कोंडी होत आहे.
यामुळे वाहनधारक, प्रवासी, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावर वारंवार अपघात होत असून, यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर काहींना गंभीर दुखापत झाली आहे. याप्रश्नी महामार्ग विस्तारीकरण कामाची ठेकेदार कंपनी, तसेच महामार्ग देखभाल विभाग व वाहतूक पोलिसांनी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारक, प्रवासी, नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, या वाहतूक कोंडीचा परिणाम शहरी वाहतुकीवरही होत असल्याने नागरिक चांगले त्रस्त झाले आहेत.
समुद्रात वादळी वाऱ्यांच्या निर्मितीमुळे पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या उर्वरित भागात मान्सूनपूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. परंतु, पावसाळ्याच्या तोंडावर शेती मशागतीची कामे सुरू असताना अचानकपणे सलग चार-पाच दिवस पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेती मशागतींच्या कामांचा मोठा खोळंबा झाला आहे. यातच हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.
सेवा रस्त्यांची चाळण
सध्या महामार्ग विस्तारीकरणाच्या कामामुळे सेवा रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खुदाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे काढण्यात आले आहेत. दरम्यान, सलग चार-पाच दिवस जोरदार पाऊस झाल्याने सेवा रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्याचबरोबर महामार्ग व सेवा रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी, यातून वाट काढताना पादचारी व दुचाकीस्वारांना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
नांदलापूर बायपास बंदचा महामार्गावर ताण
नांदलापूर (जखिणवाडी फाटा), ता. कराड येथून मलकापूर मार्गे कराड शहरात प्रवेश करण्यासाठी बायपास आहे. परंतु, सध्या जखिणवाडी फाटा येथील मळाईदेवी पतसंस्था येथे महामार्गाचे काम सुरू असल्याने महामार्गावरून मलकापूरला जाणारा बायपास वाहतुकीसाठी बंद झाला आहे. केवळ कराडमधून बाहेर पडणाऱ्या वाहनांना मलकापूर-नांदलापूर येथून महामार्गावर जाता येते. त्यामुळे शहरात जाणाऱ्या या अतिरिक्त वाहनांचा मोठा ताण महामार्गावर पडल्याने नांदलापूर ते कोल्हापूर नका यादरम्यान दररोज दिवसातून अनेकवेळा मोठी वाहतूक कोंडी होत आहे.