File Photo : Sambhaji Bhide
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतात. आजदेखील त्यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत, असा खळबळजनक दावा भिंडेंनी अमरावती दौऱ्यात बोलताना केला. यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे.
टिकली प्रकरण
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आल्यानंतर भिडे यांच्याशी एका महिला पत्रकारानं संवाद साधण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर कुंकू लाव तरच तुझ्याशी बोलेनं अशा शब्दांत भिडे यांनी बोलण्यास नकार दिला. पण भिडेंचं हे विधान हे एका महिलेचा अपमान असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान
‘काही दिवसांपूर्वी भिडे यांनी स्वाभिमान नसलेल्या निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे. असं अत्यंत वादग्रस्त विधान केले होते. सांगलीमध्ये दुर्गामाता दौडीच्या समारोप प्रसंगी त्यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. जगाच्या पाठीवर 187 राष्ट्र आहे. या राष्ट्रात आपल्याला गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा विषमपणा वाटत नाही, लाज वाटत नाही.. अशा बेशरम लोकांचा… जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश असेदेखील वादग्रस्त विधान भिडे यांनी यापूर्वी केले आहे. निर्लज्ज लोकांमध्ये चीन आघाडीवर असून, परकियांचे दास्यत्व करत, परकियांचे खरकटं-उष्टं खात.. स्वाभिमानाची शून्य जाणीव नसलेला निर्लज्ज लोकांचा देश ज्याचे नाव हिंदुस्थान असल्याचेही भिडे म्हणाले होते.
कोरोनाबाबत केले होते वादग्रस्त विधान
काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनाबाबत बोलताना देखील वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, ‘कोरोनाने जी माणसं मरतात ती जगायला लायक नाहीत. दारुची दुकानं उघडायला परवानगी आणि कुठे काही रस्त्यावर विकतोय त्याला पोलीस काठ्या मारत आहे. काय चावटपणा चाललाय? हा सर्व प्रकार महानालायकपणाचा आहे.
या सर्व विरोधात लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असलं हे शासन फेकून दिलं पाहिजे. तसेच कोरोना हा रोगच नाहीए. हा गां*** वृत्तीच्या लोकांना होणारा मानसिक रोग आहे. काही-काही होत नाही, असे विधान भिडे यांनी कोरोना काळात केले होते.
‘माझ्या बागेतील आंबे खाऊन अनेकांना मुलं झाली’
वरील विधानांसोबतच भिडे यांनी मुलांबाबतही वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळी भिडे म्हणाले होते की, लग्न होऊन 8-8, 10-10, 12-12 वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. असं झाड आहे माझ्याकडे आहे. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना हे आंबे खायला दिलेत. पथ्य सांगितले आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली.
कोण आहेत संभाजी भिडे?
मनोहर भिडे यांचा जन्म १० जून १९३३ रोजी सांगली, महाराष्ट्र येथे झाला आणि आज त्यांना संभाजी भिडे किंवा गुरुजी म्हणूनही ओळखले जाते. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात प्रवेश घेतला. पुणे, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, मुंबई आणि सातारा येथे संभाजी भिडे पूजनीय आहेत आणि त्यांचे अनुयायी मोठे आहेत.
“शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान” संस्थेच्या माध्यमातून, संभाजी भिडे यांनी १९८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांच्याविषयी शिकवण्यास सुरुवात केली. स्वतःचा गट सुरू करण्यापूर्वी संभाजी भिडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) देखील जोडलेले होते. संभाजी भिडे हे सामान्य जीवन जगण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि सामान्यत: सायकल आणि लोकल बसने प्रवास करतात. ते कधीही बूट घालत नाही.
भिडे गुरुजी १९८० पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते. त्यांचे मुख्य कार्य महाराष्ट्र हे आहे, जिथे त्यांनी संघटनात्मक स्तरावर आरएसएसच्या कार्याला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ नावाची संघटना, तसेच कट्टर मराठा हिंदू धर्म, स्वतःच्या सनातनी हिंदुत्वावर आधारित संस्था सुरू केली.