मुंबई – मुंबई महापालिकेत (BMC) टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास सुरू आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली. यावर बाळासाहेबांची शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Shital Mhatre) यांनी प्रत्युत्तर दिले. तुमच्यासाठी मुंबई दुभती गाय होती. या मुंबईचे तुम्ही लचके तोडले होते. मुंबईत आता शिंदे सरकार करत असलेले काम आपल्याला का बरे जमले नाही? २५ वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. त्यावेळी तुम्ही काय केले? तर तुम्ही दोन मातोश्री (Matoshree) बांधल्या, असा हल्लाबोल म्हात्रे यांनी केला आहे.
सत्ता गेल्याची खंत आदित्य ठाकरेंना आहे. आपण अनेक गोष्टी करू शकलो नाही, त्या गोष्टी आता होत आहेत, याच्या त्यांना वेदना होत आहेत, असेही शीतल म्हात्रेंनी म्हटले. शिंदे-फडणवीसांचे सरकार उत्तम काम करत आहे. ज्या गोष्टी २५ वर्ष तुम्हाला सुचल्या नाहीत, त्या गोष्टी आज होत आहेत. या सरकारच्या कामाचा धडाका पाहता येत्या अडीच वर्षांमध्ये मुंबईची स्थिती प्रत्येक मुंबईकराला अभिमानास्पद वाटावी, अशी होणार आहे, असेही म्हात्रे म्हणाल्या.
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या रस्त्यांसाठी पाच हजार कोटींची घोषणा केली होती. त्यासाठी काढलेले टेंडर रद्द करण्यात आले आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. पाच हजार कोटींची घोषणा केल्यानंतर मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. येत्या पावसाळ्यात खड्ड्यांमुळे मुंबईकरांचे हाल झाले, तर त्यासाठी मुख्यमंत्रीच जबाबदार असतील, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला. या आरोपांना शिंदे गटाने प्रत्युत्तर दिले आहे.