लातूरमध्ये तरुणाला नग्न करुन भररस्त्यात मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे (फोटो - सोशल मीडिया)
लातूर : महाराष्ट्रामध्ये सध्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. बीड, जालना यानंतर आता लातूरमध्ये सामान्य लोकांना मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. भररस्त्यामध्ये तरुणाला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. यामध्ये भरदिवसा आणि भररस्त्यात ही मारहाण करण्यात आला असून इतर लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे.
लातूरमधील धक्कादायक व्हिडिओने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरवला आहे. तरुणाला नग्न करुन मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये सहा ते सात तरुण एका तरुणाला मारहाण करत आहेत. लातूरमधील एका बारमध्ये या तरुणांची पीडित मुलासोबत वाद झाला होता. मात्र यानंतर हा वाद विकोपाला गेला. तरुणाला टोळक्याने जबर मारहाण केली आहे. यामधील पीडित तरुण हा गंभीर जखमी असून त्याची प्रकृती गंभीर आहे. तरुणावर सध्या उपचार सुरू आहेत. मारहाण करणारे आरोपी हे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लातूर शहरातील अंबाजोगाई रोड परिसरात असलेल्या एका बारच्या पुढे हा थरार सुरू होता. याच ठिकाणी असलेल्या राजश्री बार आणि क्लबमध्ये काही तरुणांचा वाद झाला. हा वाद बारनंतर रस्त्यावर देखील झाला. रस्त्यावर टोळक्याने तरुणाला नग्न करुन मारहाण केली. याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर याचा व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, हा व्हिडिओ पाहिला आणि तळपायाची आग मस्तकात गेलीय…कोणताही माणूस असू द्या क्षणात विचार करेल अरे सुरू काय आहे महाराष्ट्रात…..आवरा ह्यांना …..एखाद दिवशी यंत्रणेलाच आव्हान देतील हे. सावध व्हा आणि कारवाई करा चांगले पी.पी द्या कोर्टात उगाच नावाला कारवाई करू नका, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी लातूर पोलिसांना केले आहे.
हा व्हिडिओ पाहिला आणि तळपायाची आग मस्तकात गेलीय…
कोणताही माणूस असू द्या क्षणात विचार करेल अरे सुरू काय आहे महाराष्ट्रात…..
आवरा ह्यांना …..एखाद दिवशी यंत्रणेलाच आव्हान देतील हे …
सावध व्हा आणि कारवाई करा
चांगले पी.पी द्या कोर्टात उगाच नावाला कारवाई करू नका @LaturPolice pic.twitter.com/6g0YLbfjtA— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 11, 2025
बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा अत्याचाराचे आणि अमानुष मारहाणीचे व्हिडिओ समोर येत आहेत. भाजप नेते व आमदार सुरेध धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याचे देखील असेच तरुणाला मारहाण केल्याचे आणि पैसे उधळ्याचे व्हिडिओ समोर आले होते. संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण केल्याचे फोटो देखील समोर आले आहेत. जालनामध्ये मंदिरामध्ये जाण्यावरुन तरुणाला सळईचे चटके देण्यात आले. यानंतर आता लातूरमधील व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे महाराष्ट्रामध्ये नक्की चाललं तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे विरोधक देखील आक्रमक भूमिका घेत आहे.