फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन कायमच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. नुकतंच एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या कुटुंबियांबद्दल महत्वाचं वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर, अभिषेकने आपली पत्नी आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय हिच्याबद्दलही मोठं वक्तव्य केलं आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिषेकने त्याची ऐश्वर्यासोबत शिवाय वडील अमिताभ बच्चन यांच्याशी सतत होत असलेल्या तुलनेबद्दलही मोठं वक्तव्य केलं आहे.
CNBC TV18 India ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक म्हणाला की, मला वडील अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच वयाच्या ८२ व्या वर्षापर्यंत काम करायचं आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये आपलं नाव घेतलं जाणं ही अभिमानाची बाब असल्याचंही तो म्हणाले. जेव्हा त्यांची तुलना त्यांच्या वडिलांशी किंवा त्यांच्या कुटुंबाशी केली जाते तेव्हा मला अभिमान वाटतो. स्वत:च्या कुटुंबातील सदस्यांच्या यशाची आणि कर्तृत्वाची जेव्हा तुलना आपल्यासोबत केली जाते, तेव्हा त्याचा तुझ्यावर काही परिणाम होतो का? असा प्रश्न अभिषेकला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेत्याने खूप सकारात्मक पद्धतीने उत्तर दिली आहेत.
अभिषेक म्हणाला की, “आपली तुलना सतत घरातल्या व्यक्तींसोबत होणं, हे केव्हाच सोप्पं नसतं. मला गेल्या २५ वर्षांपासून हाच प्रश्न विचारला जातोय त्यामुळे मला आता त्याची सवय झाली आहे. जरीही तुम्ही माझी तुलना माझ्या वडिलांसोबत करत असाल, तर तुम्ही माझी तुलना सर्वोत्तम व्यक्तीशी करत आहात. जर माझी तुलना सर्वोत्तम व्यक्तीशी केली जात असेल, तर कदाचित माझीही त्या महान व्यक्तींसोबत गणना होण्यासाठी मी पात्र आहे, असं मला वाटतंय. म्हणजे माझा या तुलनेकडे पाहण्याचा असा दृष्टिकोन आहे. माझे आई-वडील माझे आहेत, माझं कुटुंब माझं आहे, माझी बायको माझी आहे आणि मला त्यांचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आणि ते जे करत आहेत त्याचा मला खूप अभिमान आहे.”
सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मध्यप्रदेशातून एकाला केली अटक
मुलाखतीत अभिषेकने वडिलांच्या कामाचं कौतुक करताना असं देखील की, “आपण इथे मुंबईत एका छान एसी रूममध्ये बसून ही मुलाखत करत आहोत, छान कॉफी पीत आहोत आणि ते (अमिताभ बच्चन) ८२ वर्षांचे सकाळी ७ पासून केबीसीसाठी शूटिंग करत आहेत. ते समाजासमोर एक उत्तम उदाहरण मला माझ्या वडिलांसारखं व्हायचं आहे. मला माझ्या वडिलांप्रमाणे वयाच्या ८२ व्या वर्षापर्यंत काम करायचं आहे. जेव्हा मी रोज रात्री झोपायला जातो, तेव्हा मला एवढंच वाटतं की, मी सुद्धा जेव्हा ८२ वर्षांचा असेल तेव्हाही माझ्या मुलीने माझ्याबद्दल असं म्हणायला हवं की, ‘माझे वडील ८२ वर्षांचे आहेत आणि अजूनही काम करत आहेत.’
अभिषेक बच्चनच्या कामाबद्दल बोलायचं तर, अभिषेक शेवटचा ‘या वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात बाप- लेकीच्या नात्यावर भाष्य करण्यात आले होते. त्यानंतर अभिनेता लवकरच शाहरुख खानबरोबर सिद्धार्थ आनंदच्या ‘किंग’ चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिषेक वर्मा आणि सुहाना खानही दिसणार आहे. तसेच तो रेमा डिसुझाच्या ‘हॅप्पी’चित्रपटातही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अभिषेकचे २०२५ या वर्षात दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.