अन्नू कपूर यांनी व्यक्त केली शेवटची इच्छा (Photo Credit- X)
बॉलीवूडचे दिग्गज कॉमेडियन आणि अभिनेते गोवर्धन असरानी, ज्यांना प्रेमाने ‘असरानी’ म्हटले जाते, त्यांनी या जगाचा निरोप घेतला. दिवाळीच्या दुपारी त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील भारतीय आरोग्य निधी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. फुफ्फुसांमध्ये पाणी भरल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
असरानींची इच्छा होती की, त्यांच्यावर कोणताही तामझाम न करता साधेपणाने अंत्यसंस्कार व्हावेत. त्यानुसार, त्यांच्या निधनाची बातमी लोकांना मिळण्यापूर्वीच त्यांच्या कुटुंबाने त्यांचे अंत्यसंस्कार उरकून टाकले. यामुळे चित्रपटसृष्टीतील लोकांना त्यांचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही.
असरानी यांच्या निधनानंतर अभिनेते अन्नू कपूर यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आपली अंतिम इच्छा लोकांसमोर व्यक्त केली. त्यांनी असरानी यांच्यासोबतची शेवटची भेटही आठवली. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अन्नू कपूर म्हणाले, “ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. यात शंका नाही की ते एक अद्भुत अभिनेते होते. मी त्यांना शेवटचे २० मार्च २०२३ रोजी ‘नॉन स्टॉप धमाल’ चित्रपटाच्या सेटवर पाहिले होते, पण ती त्यांच्यासोबतची माझी शेवटची भेट असेल हे माहीत नव्हते.”
#WATCH | Mumbai | On the demise of Veteran Actor-director Govardhan Asrani, Actor Annu Kapoor says, “…May his soul rest in peace and may god grant strength to his family to bear this loss…There is no doubt that he was an amazing actor…I saw him last time on 20th March 2023… pic.twitter.com/e9i4MY0mPp — ANI (@ANI) October 21, 2025
असरानींच्या शेवटच्या इच्छेने आपल्याला प्रेरित केले, असे सांगत अन्नू कपूर म्हणाले, “जेव्हा या जगातून माझा ‘चेकआउट’ करण्याचा (मरण्याचा) वेळ येईल आणि ती तारीख व वेळ जर एखाद्या राष्ट्रीय सणाशी – १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीशी किंवा दिवाळी, होळी, ईद यांसारख्या मोठ्या उत्सवाशी जोडलेली असेल, तर माझेही अंत्यसंस्कार गुप्तपणे केले जावेत. मला कोणालाही त्रास द्यायचा नाही आणि मला या जगात कोणावरही ओझे बनून जगायचे नाही.”
काही महिन्यांपूर्वीही असरानींच्या निधनाची अफवा पसरली होती, तेव्हा त्यांनी ‘अशा बातम्यांनी वय वाढते’ असे म्हटले होते. त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या करिअरमध्ये ३५० हून अधिक हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले.
दीपिकाची छबी, गालावर खळी; रणवीर-दीपिकाने घरच्या ‘लक्ष्मी’चा चेहरा केला Reveal