फोटो सौजन्य: सोशल मीडिया
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची मुलगी आणि महानायक अमिताभ बच्चन यांची नात आराध्या कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिली आहे. अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत राहिलेल्या आराध्याने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. आराध्याविषयी सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या काही ऑनलाइन कंटेंटविरोधात तिने पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘बार अँड बेंच’ने दिलेल्या वृत्तानुसार १३ वर्षांच्या मुलीबद्दल खोटी माहिती पसरवण्याविरुद्धच्या तिच्या याचिकेवर ३ फेब्रुवारी रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने गूगलसह इतर काही प्लॅटफॉर्मना नोटीस बजावली आहे.
‘बार अँड बेंच’ने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये म्हटलेय की, बच्चन कुटुंबाच्या वकिलाने आराध्या बच्चनच्या विरोधात वेबसाइटवरील दिशाभूल करणाऱ्या बातम्यांबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात, दिल्ली उच्च न्यायालयाने गुगलसह काही ऑनलाईन वेबसाईट्सलाही कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. अजूनही आराध्याबद्दलच्या खोट्या माहिती देणाऱ्या व्हिडिओ आणि बातम्या असल्याचा पुरावा समोर आला आहे. याप्रकरणी तिने संक्षिप्त निकाल देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. काल म्हणजेच ३ फेब्रुवारी रोजी, झालेल्या याचिकेमध्ये न्यायालयाकडून गूगलसह इतर काही प्लॅटफॉर्मना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी १७ मार्चला करण्यात येणार आहे.
एप्रिल २०२३ मध्ये, वडिल अभिषेक बच्चनच्या मदतीने आराध्याने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती. आराध्याने गूगल, यूट्यूब आणि अन्य वेबसाइटवर तिच्या आरोग्याविषयीची चुकीची माहिती देण्यात आल्याचं तिने याचिकेमध्ये म्हटलं होतं. न्यायालयाने यूट्यूबवर आराध्याच्या आरोग्याविषयीच्या चुकीच्या माहिती देणाऱ्या असलेल्या व्हिडीओ हटवण्यास सांगण्यात आले होते. शिवाय गूगलवरून ही माहिती काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले होते. आराध्या सध्या ‘गंभीर आजारी’ आहे किंवा तिचे निधन झाले आहे असा चुकीचा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आला होता. हे प्रकरण तुफान व्हायरल झालं होतं. ही सुनावणी न्यायमूर्ती सी. हरी शंकर यांनी केली होती.
२०२३ मध्ये झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती सी. हरी शंकर म्हणाले होते की, “एका अल्पवयीन मुलीबद्दल खोटी माहिती पसरवणं हे कायद्याचं उल्लंघन आहे. त्यामुळे खोटी माहिती पसरवली जाणारी माहिती तातडीने काढून टाकावी. शिवाय भविष्यात असा प्रकार घडणार नाही, याचीही काळजी घ्यावी. केंद्र सरकारने अशी माहिती ब्लॉक करावी. सोबतच, गूगलनंही नियमांचं पालन करावं.” पण, अजूनही काही व्हिडीओ आणि खोटी माहिती गूगलवर असल्यामुळे आराध्याने पुन्हा एकदा न्यायालयामध्ये धाव घेतली आहे.