( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
रोहित शेट्टीच्या सुपरहिट ‘गोलमाल’ फ्रँचायझीचा पाचवा भाग ‘गोलमाल ५’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आता या चित्रपटासंदर्भात एक मोठे अपडेट समोर आले असून, ‘जवान’ फेम अभिनेत्री प्रियामणी या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, प्रियामणी ‘गोलमाल ५’मध्ये मुख्य खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. आतापर्यंत दमदार आणि भावनिक व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रियामणी यावेळी प्रथमच नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याने तिच्या भूमिकेबद्दल उत्सुकता वाढली आहे. रोहित शेट्टीच्या कॉमेडी विश्वात तिच्या एंट्रीमुळे कथेला वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रियामणी आणि रोहित शेट्टी यांचे हे पहिले सहकार्य नाही. यापूर्वी ती शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटातील गाजलेल्या ‘1 2 3 4 Get on the Dance Floor’ या गाण्यात झळकली होती. तसेच अजय देवगणसोबत ‘मैदान’ चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. मात्र, यावेळी तिची भूमिका पूर्णपणे वेगळी आणि आव्हानात्मक असणार आहे.
‘गोलमाल ५’च्या शूटिंगला फेब्रुवारी २०२६ मध्ये सुरुवात झाली आहे. चित्रपटात अजय देवगणसोबत अक्षय कुमार, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, कुणाल खेमू आणि पहिल्या भागानंतर पुनरागमन करणारा शर्मन जोशी हे कलाकार झळकणार आहेत. याशिवाय जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, मुकेश तिवारी आणि अश्विनी कळसेकर हे लोकप्रिय कलाकारही पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत.
कॉमेडी, अॅक्शन, गोंधळ आणि भन्नाट ट्विस्टचा तडका असलेला ‘गोलमाल ५’ पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






