( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
अंशुला कपूर आणि रोहन ठक्कर यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर हिने आपल्या मोहक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेली आकर्षक सिल्क साडी आणि स्ट्रॅपलेस ब्लाउजमध्ये जान्हवी अत्यंत देखणी दिसत होती. मात्र, तिच्या लूकपेक्षाही तिच्या हातावरील खास मेहंदीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
जान्हवीने या सोहळ्यातील काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंमध्ये तिच्या मेहंदीमध्ये ‘शिखू’ हे नाव दिसून आले. ‘शिखू’ हे तिचा कथित प्रियकर शिखर पहारिया यांचे टोपणनाव असून, ते मेहंदीच्या डिझाइनमध्ये अतिशय सुंदर आणि सूक्ष्म पद्धतीने समाविष्ट करण्यात आले होते. सध्या सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली.
जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. त्यांच्या मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झाल्याचे बोलले जाते. २०१६ मध्ये त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर २०१८ मध्ये दोघे वेगळे झाल्याच्या बातम्याही समोर आल्या. मात्र, २०२३ पासून ते पुन्हा अनेक कार्यक्रम, पार्ट्या, सुट्ट्या, अनंत अंबानी यांच्या विवाहसोहळ्याचे कार्यक्रम आणि तिरुपती मंदिरात एकत्र दिसू लागल्याने त्यांच्या नात्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले.
जान्हवीने शिखरवरील प्रेमाची झलक यापूर्वीही अनेकदा दिली आहे. २०२४ मध्ये ‘मैदान’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान ती ‘शिखू’ नावाचा नेकलेस परिधान करून आली होती. तसेच ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात तिने स्पीड डायलवरील नावांचा उल्लेख करताना नकळत शिखरचे नाव घेतले होते, ज्यामुळे त्यांच्या नात्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले.
View this post on Instagram
दरम्यान, शिखर पहारिया हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू आहेत. ते उद्योजिका स्मृती शिंदे आणि उद्योगपती संजय पहारिया यांचे पुत्र असून, ते एक उद्योजक आणि गुंतवणूकदार म्हणून ओळखले जातात.
जान्हवी कपूरच्या या खास मेहंदीने पुन्हा एकदा तिच्या आणि शिखर पहारिया यांच्या नात्याची चर्चा रंगवली असून, तिचे रिसेप्शनमधील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.






